

अकोले : पुढारी वृत्तसेवा : केळी फाटा ते ठाणगाव रस्ता सुधारणा काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केळी रुम्हणवाडीसह म्हाळुंगी परिसरातील ग्रामस्थांनी करत सामुदायिक रित्या उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे. केळी फाटा ठाणगाव माळुंगी, पाचपट्टा रस्ता सुधारणा करण्याच्या कामासाठी सुमारे तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यातून केळी फाटा-ठाणगाव ते म्हाळुंगी या रस्त्याचे काम सुरू आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याने तीन दिवसांपूर्वी स्थानिक ग्रामस्थांनी काम बंद पडले होते. ठेकेदार आणि अकोले सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकार्यांना याची कल्पना देवूनही ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरूच ठेवले आहे. परिणामी स्थानिक ग्रामस्थांनी निकृष्ट होत असलेल्या रस्त्या कामासंदर्भात टोकाचा निर्णय घेतला. रस्त्याचे काम थांबले नाही तर जेसीबीच्या साह्याने निकृष्ट रस्त्याचे काम उखडून टाकण्यात येईल असा इशारा केळी रुम्हणवाडी येथील ज्ञानेश्वर शिंदे, निलेश गणपत शिंदे, राहुल शिंदे, पोपट शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.
अकोले तालुक्यात काही ठिकाणी काम निकृष्ट होत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे. तीन दिवसांपूर्वी केळी फाटा ते ठाणगाव या रस्त्याचे काम बंद पाडल्यानंतर अधिकार्यांना सुचना केली. निकृष्ट प्रतीचे काम करणार्या कोणालाही पाठीशी घालणार नाही.
– बाजीराव दराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
जिल्हा हद्दीवरील केळी फाटा-पाचपट्टा माळुंगी ते ठाणगाव रस्ता सुधारणाचे कामावर वापरण्यात येणारी बारीक खडी बंद केली आहे. ठेकेदाराला कामाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कामाची गुणवत्ता व दर्जा सुधारण्याची ताकीद दिली आहे.
– महेंद्र वाकचौरे, उपअभियंता
केळी फाटा ते ठाणगाव रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट. रस्त्याच्या पृष्ठभागास डांबराचा वापर नाही. बीबीएमसाठी निकृष्ट दर्जाची 20 ते 30 एमएम खडीचा वापर. बीबीएम करताना डांबराचा अत्यल्प वापर. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकार्यांकडून दुर्लक्ष.
हेही वाचा