राष्ट्रवादीच्या बैठकीला आमदारांची दांडी : पदाधिकार्‍यांत जुंपल्याने गुंडाळली बैठक | पुढारी

राष्ट्रवादीच्या बैठकीला आमदारांची दांडी : पदाधिकार्‍यांत जुंपल्याने गुंडाळली बैठक

नगर : पुढारी वृत्तसेवा : महायुतीत जागावाटप प्रलंबित असतानाच राष्ट्रवादीने मुंबईत नगर लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला चारही आमदारांनी दांडी मारली. जिल्ह्यातील मोजकेच पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड व बाळासाहेब नाहाटा यांच्यात बैठकीतच तू तू-मै मै झाली. त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांत बैठक गुंडाळण्याची नामुष्की प्रदेश नेत्यांवर आली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभेच्या दहा जागांवर दावा ठोकला असून त्यात नगर दक्षिणेच्या जागेचाही समावेश असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील महिला विकास मंडळात नगरमधील प्रमुख पदाधिकारी, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधींची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बोलाविली होती.

मात्र भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौर्‍यात सहभागी झाल्याने पवार हे बैठकीला उपस्थित नव्हते. मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ, रूपाली चाकणकर यांनी नगरचा आढावा घेतला. या बैठकीत बाळासाहेब नाहटा आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचे समजते. नगरमधून एकही इच्छुकाचे नाव समोर न आल्याने अवघ्या 15 मिनिटांतच ही बैठक गुंडाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाळासाहेब नाहाटा, अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, उत्तरेचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राजेंद्र गुंड, संजय कोळगे, संपत बारस्कर, वैभव ढाकणे असे मोजकेच पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी नगरचा राजकीय आढावा देताना गत निवडणुकीतील पक्षाच्या मतांची आकडेवारी सादर केली. पक्ष कसा मजबूत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेब नाहाटा यांनी जिल्ह्यातील पारेनर, श्रीगोंदा वगळता कार्यकारिणीही नाही. मुंबई बैठकीचे कोणालाही निरोप दिलेले नाहीत, पक्षाला पूर्णपणे मरगळ आली आहे, असा आरसाच दाखविला. यातून नाहटा आणि गायकवाड यांच्यामध्ये खडाजंगी झाली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनीच मुंबईत नगरच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, नगरमधील पक्षाच्या अवस्थेबद्दल मंत्री भुजबळ आणि मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

बैठक कशासाठी

लोकसभा निवडणुकीसाठी नगरमधून कोणाला उमेदवारी द्यायची, कोण उमेदवार असावा, कोणाची नावे आली आहेत, यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत बुधवारी राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रूपाली चाकणकर, सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत नगरची बैठक झाली.

या प्रमुखांची दांडी : आमदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले.

आ. नीलेश लंके ‘तुतारी’ वाजविणार?

अजित पवारांसोबत गेलेले पारनेरचे आ. नीलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीच्या जागावाटपात नगरची जागा भाजपकडे आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत. मात्र महायुतीत असूनही विखे-लंकेंचे सूर जुळले नाहीत. भाजपचे आ. राम शिंदे यांच्यासह अनेक नेते लंके यांच्या व्यासपीठावर हजेरी लावत आहेत. एकमेकांविरोधात बोलण्याची एकही संधी विखे-लंके सोडत नाहीत. त्यातच दोन दिवसांपूर्वी खा. अमोल कोल्हे यांनी आ. लंके यांना ‘खुली ऑफर देत तुतारी’ वाजविण्यासाठी साद घातली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आ. लंके यांची मुंबईतील बैठकीकडे फिरविलेली पाठ पाहता ते ‘तुतारी’ वाजविण्याच्या तयारीत तर नाहीना, या शक्यतेला बळ मिळू पाहते आहे.

हेही वाचा

Back to top button