नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील दलित, आदिवासी, भटके विमुक्त समाजातील लोकांवर वाढता अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ जनहित सुशिक्षित बेरोजगार युवा संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला. आरोपींना पाठीशी घालणार्या पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून सदर समाजाला सुरक्षितता प्रदान करण्याची मागणी करण्यात आली.
मागासवर्गीय आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ज्या योजना सुरु आहेत. त्या योजना मागासवर्गीय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास बँकेकडून टाळाटाळ केली जात आहे. बँकेतील अधिकार्यांच्या आडमुठेपणामुळे ते लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे समाजात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. महार वतन व इनामी जमिनीच्या खोटी खरेदी करून काही गुंडांकडून हडप करण्याचा प्रकार सुरु असल्याचे निवेदनात म्हटले.
जिल्हा दलित, आदिवासी अन्याय अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावा, सामाजिक न्याय विभागात जिल्हा पोलिस अधीक्षक दर्जाचे पद उपलब्ध करून त्यांच्यामार्फत सामाजिक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, मागासवर्गीय समाजासाठी रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजना मागासवर्गीय लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यात याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात संघर्ष समितीचे अध्यक्ष कुणाल इंगळे, पवनकुमार साळवे, उपाध्यक्ष नवनाथ चव्हाण, सचिव अमोल मिरपगार, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, इम्पाचे जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रननवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, सचिन दळवी, प्रथमेश सोनवणे, अतिश सोनवणे आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा