कर्जतची एमआयडीसी आता थेरगाव परिसरात! | पुढारी

कर्जतची एमआयडीसी आता थेरगाव परिसरात!

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जतमधील नियोजित एमआयडीसीसाठी आता पाटेगाव ऐवजी तालुक्यातील कोंभळी, रवळगाव थेरगाव हद्दीतील जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. साधारणतः 400 हेक्टर कोरडवाहू जमीन याठिकाणी उपलब्ध आहे. नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळच आहे. त्यासाठी काही तांत्रिक बाबीची पूर्तता करण्याचा निर्णय मुंबईतील बैठकीत घेण्यात आला आहे. नियोजित एमआयडीसीसंदर्भात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत व आमदार प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक झाली. यामध्ये हा निर्णय झाला. कोंभळी, थेरगाव परिसरातील क्षेत्र 250 हेक्टरपेक्षा जास्त असल्यामुळे महामंडळाचे जॉईट सीईओ भंडारी हे भूअहवाल सादर करणार आहेत. तो अहवाल हाय पॉवर कमिटीपुढे सादर करण्यात येणार आहे.

जागेबाबत उद्योग मंत्री सामंत व अधिकार्‍यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. पुढील प्रक्रिया थोड्याच कालावधीत पूर्ण होईल.थेरगाव परिसर हा अवर्षण प्रवण भाग आहे. त्यामुळे इथे कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आता या ठिकाणी औद्योगिक वसाहत होताना या भागाचा निश्चित कायापालट होणार आहे. या भागात एमआयडीसी व्हावी, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे आग्रही होते. त्यांनी यासाठी जागा सूचवली होती. या बैठकीस सभापती काकासाहेब तापकीर, भाजप तालुकाध्यक्ष शेखर खरमारे, सचिन पोटरे, पप्पू धोदाड, गणेश क्षीरसागर, नंदकुमार नवले, महेश तनपुरे, राहुल गांगर्डे, नंदलाल काळदाते, बजरंग कदम, काका ढेरे, गणेश पालवे,शरद मेहत्रे,तात्यासाहेब खेडकर, शहाजी राजे भोसले, धनु मोरे, दत्ता मुळे उपस्थित होते. या जागेची निवड म्हणजे आमदार शिंदे यांनी शाश्वत विकासाची गंगा या अवर्षण प्रवण भागात आणल्याने तापकिरे म्हणाले.

हेही वाचा

Back to top button