एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू : आमदार नीलेश लंके | पुढारी

एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवू : आमदार नीलेश लंके

टाकळी ढोकेश्वर : पुढारी वृत्तसेवा : एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून, त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे आश्वासन आमदार नीलेश लंके यांनी दिले. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचा दोन दिवसीय राज्य मेळावा नुकताच संघटनेचे कार्याध्यक्ष तुकाराम गालेवाड यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे झाला. आमदार लंके यांनी मेळाव्याला भेट देऊन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांशी चर्चा केली. सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे.

राज्यभरात जवळपास 66 हजार कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत. राज्यातील सर्व विभागीय कार्यालयांसमोर 29 जानेवारीला केलेल्या निदर्शनांची दखल घेत व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी चर्चा करून प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यावर लवकरच परत एकदा व्यवस्थापकीय संचालकांची भेट केंद्रीय कार्यकारिणी घेईल व पुढील दिशा ठरविली जाईल, असे विचारे यांनी सांगितले. या मेळाव्यात काही महत्त्वाचे ठराव, वार्षिक अहवाल एकमताने चर्चा होऊन संमत करण्यात आले. केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकार्‍यांनी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे, सचिव गोरख बेळगे, कार्याध्यक्ष अर्जुन बकरे, खजिनदार विठ्ठल देवकर आदींनी मेहनत घेतली.

हेही वाचा

Back to top button