म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईस पालकमंत्रीच जबाबदार : शैलेश कलंत्री | पुढारी

म्हाळुंगी पुलाच्या दिरंगाईस पालकमंत्रीच जबाबदार : शैलेश कलंत्री

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : म्हाळुंगी नदीला 2022 मध्ये आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला. हा पूल तातडीने बांधावा, याकरता निधीसाठी काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात व आ. सत्यजित तांबे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला; मात्र पूल होऊ नये, यासाठी भाजप स्थानिक पदाधिकार्‍यांनी पुलाचे राजकारण केले. पालिका प्रशासन, राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजप व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी संगमनेरकरांना त्रास देण्याकरता अनेक विकासकामे रोखली. म्हाळुंगी नदी पुलाचे काम जाणीवपूर्वक रखडवले, अशी टीका माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केली.

कलंत्री म्हणाले, ऑक्टोबर 2022 मध्ये म्हाळुंगी नदीला पूर आल्यामुळे साईनगर व पंपिंग स्टेशनकडे जाणारा पूल खचला. यानंतर काँग्रेसचे नेते आ. थोरात व नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तत्काळ पाहणी करून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली. नवीन पुलाकरता 30 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साडेचार कोटी रुपये निधीची मागणी केली. या कामास मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केला, मात्र स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी या कामाचे श्रेय घेण्याकरता पालकमंत्री विखे यांच्यामार्फत राजकारण केले. हे काम रखडवून स्थानिक नागरिकांच्या मनात द्वेषभावना निर्माण करण्याचा हेतू त्यांचा आहे, असा आरोप कलंत्री यांनी केला.

मागील अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. पालिकेमध्ये प्रशासक आहे. राज्यासह केंद्रात भाजप सरकारे आहेत. सत्तेच्या लालसेपोटी विखे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. त्यांच्याकडे आता महत्त्वाचे महसूलमंत्रिपद आहे. जिल्ह्यात प्रशासनासह निधी वाटपात त्यांची सत्ता चालते. अशा वेळी त्यांनी या कामासाठी एक रुपयाही नवा निधी दिला नाही. उलट आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून तहसील कार्यालयाजवळ सुरू असलेले शॉपिंग सेंटरचे काम अर्धवट बंद करून तो निधी म्हाळुंगी नदी पुलाकरिता वळविला. खरेतर मंत्री विखे यांनी असे न करता नवीन निधी मिळवायला हवा होता, असे असताना दीड वर्षांपासून काम बंद आहे.नवीन पूल उभारणीसाठी आ. थोरात व आ. तांबे यांनी सतत सरकारदरबारी पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली, असे कलंत्री म्हणाले.

हेही वाचा

Back to top button