गवंड्याला दिले अडीच कोटींचे; कर्जतपासणी अधिकारी व थकीत कर्जदार यांना अटक | पुढारी

गवंड्याला दिले अडीच कोटींचे; कर्जतपासणी अधिकारी व थकीत कर्जदार यांना अटक

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर अर्बन बँक घोटाळ्याच्या गुन्ह्यात मंगळवारी बँकचे मुख्य कर्जतपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया व थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे यांना अटक केली. ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने केली असून, आरोपींना उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बँकेने कर्जविरण करताना गवंडी काम करणार्‍या व्यक्तीला अडीच कोटींचे कर्ज दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी यांच्या फिर्यादीवरून बँकेचे तत्कालीन चेअरमन स्व. दिलीप गांधी यांच्यासह तत्कालीन संचालक, बँकेचे वरिष्ठ अधिकारी, आशुतोष संतोष लांडगे, सचिन दिलीप गायकवाड, रेणुकामाता मल्टिस्टेट सोसायटी लि., मुख्य शाखेचे व्यवस्थापक अच्युत घनश्याम बल्लाळ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात 150 कोटींचा घोटाळा फॉरेन्सिक ऑडिटनंतर 291 कोटींवर जाऊन पोचला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने आतापर्यंत पोलिस तपासात शाखाधिकारी मुकेश जगन्नाथ कोरडे, प्रदीप जगन्नाथ पाटील, बँकेचे माजी संचालक मनेष दशरथ साठे (रा. सारसनगर), अनिल चंदूलाल कोठारी (रा. माणिकनगर), माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना अटक केली.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचा पदाभार पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे आल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला गती आली. बँकेचे अधिकृत सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी याला अटक केली. आज बँकेचे मुख्य कर्ज तपासणीस मनोज वसंतलाल फिरोदिया व थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे यांना आज अटक केली. उद्या त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक दिवटे, पोलिस कर्मचारी दीपक गाडीलकर, जंबे, घोडके, क्षीरसागर याच्या पथकाने केली. दरम्यान, बँकेचे अधिकृत सीए व माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी याची पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

किरकोळ मिळकतीवर दिले कोटींचे कर्ज?

अर्बन बँक घोटाळ्यात आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने थकीत कर्जदार प्रवीण सुरेश लहारे याला अटक केली. लहारे बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झाले आहे. लहारे गवंडी काम करीत असून, त्यांच्या किरकोळ मिळकतीवर अडीच कोटींचे कर्ज काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

कर्जप्रकरणासाठी बनावट कागदपत्रे

बँकेतील प्रत्येक कर्ज प्रकरणाची कागदपत्रे फिरोदिया तपासत होते. मात्र अनेक बनावट कर्जप्रकरणे फिरोदिया यांच्या तपासणीतून पुढे गेल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा

Back to top button