

घारगाव : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातून जाणार्या मुळा नदीपात्राची वाळूतस्करांनी अक्षरशः चाळण केली आहे. येथे राजरोसपणे भरदिवसा आणि रात्रीच्या काळोखातही मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा सुरू आहे. विविध वाहनांतून राजरोसपणे वाळू वाहतूक केली जात आहे. मात्र आता महसूल विभागाने हा अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी कंबर कसली आहे. नदीकड़े जाणारे रस्ते खोदण्यात आले असून, वाळू तस्करांवर कायदेशीर कारवाईचे आदेश तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिले आहेत.
साकूर पठार भागातील जांबुत, साकूर, मांडवे, शिंदोडी परिसरातील मुळा नदी पात्रातून वाळूउपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीपात्रात जाणार्या रस्त्यावर थेट जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून रस्ते अडविण्याचे धोरण महसूल विभागाने अवलंबिले आहे.
साकूर मंडलातून गेल्या महिनाभरापासून दिवसाढवळ्या वाळूची वाहने बेधुंद वेगाने सुसाट पळत होती. या वाहनांचे चालक अनेकदा नशेत असल्याचे आढळून येत होते.
वाळू तस्करांच्या वाढत्या मुजोरीने व दहशतीने सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असल्याची भावना बाळगून भीतीच्या छायेत जगत असल्याचे चित्र साकूर पठार भागात दिसून येत आहे. साकूर पठार भागातील मांडवे बुद्रुक, शिंदोडी, साकूर, जांबुत व खैरदरा तर पारनेर हद्दीतील देसवडे, टेकडवाडी, मांडवे खुर्द व नागापूरवाडी येथून देखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होेतो. संगमनेरचे महसूल अथवा पोलिस पथक आले तर वाळू तस्कर आपली वाहने पारनेर हद्दीत नेतात. तर पारनेर तालुक्याचे महसूल अथवा पोलिस पथक आले की संगमनेर तालुक्यात आपली वाहने पळवितात. संगमनेर महसूल पथकाने महसूल विभागाने तात्काळ मुळा नदीत उतरणार्या रस्त्यांवर चर खोदून रस्ते बंद केले आहेत. पुन्हा वाळू तस्करी करताना कुठलेही वाहन आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा साकूर मंडलचे मंडल अधिकारी काळे यांनी दिला आहे.