भ्रष्टाचार करा अन् भाजपात या, हीच मोदींची गॅरंटी : उद्धव ठाकरे | पुढारी

भ्रष्टाचार करा अन् भाजपात या, हीच मोदींची गॅरंटी : उद्धव ठाकरे

सोनई; पुढारी वृत्तसेवा : भाजपचा कारभार जनता, देश आणि संपूर्ण जग बघत आहे. भ्रष्टाचार करा अन् भाजपात या. काहीच नाही होणार. राज्यसभा मिळेल. मुख्यमंत्रिपद मिळेल, उपमुख्यमंत्रिपद मिळेल. ईडीवाले कोण? घरात झाडू मारतील. हीच का मोदींची गॅरंटी, असा घणाघाती सवाल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केला.

ठाकरे यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा मराठवाड्यातून आज (मंगळवारी) शनिशिंगणापूर मार्गे नगर जिल्ह्यात आली. त्या वेळी सोनई येथे झालेल्या जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत राज्य आणि केंद्र सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, आमदार शंकरराव गडाख आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, कट्टर भाजप आणि संघ कार्यकर्त्यांबद्दल आदर आहे. पिढ्यान् पिढ्या वर्षानुवर्षे कुटुंब बाजूला ठेवून, भाजप वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अशा निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावर भ्रष्ट, उपरे बसविले जात आहेत. त्यांच्या मेहनतीकडे, कुटुंबांकडे दुर्लक्ष केले, हेच तुमचे हिंदुत्व का? हे हिंदुत्व भाजपला, संघाला मान्य आहे का, असा सवाल करतानाच निष्ठावंत उपर्‍यांचे काम करत राहणार काय? तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व, देशप्रेम, देशद्रोही हे मान्य करणार नाही.

अशोक चव्हाणांमुळे ‘आदर्श’ची आठवण

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत भाष्य करताना ठाकरे म्हणाले, की चव्हाण अचानक जातील असे वाटले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले होते, ते ऐका. आम्ही चव्हाण यांच्यावर आरोप केले नव्हते. आरोप करणारे स्वत: पंतप्रधान मोदीच होते. केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेतही आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आहे. खरे तर आदर्श घोटाळा आम्ही विसरलो होतो. त्या घोटाळ्याची आठवण चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर झाली. ‘आदर्श’च्या घरांमध्ये शहीद कुटुंबीयांचा अपमान कोणी केला, असा सवाल करत पंतप्रधानांनी त्यावेळी अशोक चव्हाणांचे नाव घेतले होते. ते लीडर नाही तर डीलर आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

Back to top button