जनतेची काळजी घेण्यास सक्षम : आ. आशुतोष काळे | पुढारी

जनतेची काळजी घेण्यास सक्षम : आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  त्यांच्याकडे चाळीस वर्षे सत्ता होती, त्या वेळी त्यांनी किती प्रश्न सोडविले व चार वर्षांत मतदारसंघातील किती प्रश्न सुटले, हे मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे मागील चार वर्षातील कामगिरीवर मतदारसंघातील जनता समाधानी आहे. परंतु ज्याचे अस्तित्व संपत चालले आहे, त्यांच्याकडून स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी उगाचच आकांडतांडव करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. मात्र जनता माझ्यासोबत असल्यामुळे त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. जनतेची काळजी घेण्यासाठी आपण सक्षम असून विरोधकांना मात्र त्यांच्या राजकीय अस्तित्वाची चिंता पडल्याची बोचरी टीका आ. आशुतोष काळे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता केली.

कोपरगाव तहसील कार्यालयात आ. काळे यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन विविध शासकीय योजनांचा आढावा घेऊन तातडीने प्रस्ताव तयार करावेत व जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी घेऊन शासनाकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. गरजू पात्र लाभार्थ्यांच्या 811 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यावेळी आ. काळे म्हणाले की, मतदारसंघाचा झालेला विकास, बदललेला चेहरा विरोधकांना देखवत नाही. ज्यांना काही काम नाही, ज्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याच्याकडून जनतेत संभ्रम पसरविण्याचा व जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. मी नागरिकांच्या गरजा ओळखून काम करतो. नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असून माझ्या पद्धतीने मी लढत आहे. जनतेचे प्रश्न सुटले तर राजकारण संपणार आहे. मग कोणत्या प्रश्नावर राजकारण करायचे? याचा प्रश्न विरोधकांना पडल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटूच नये यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे.
तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button