आमदार फोडीनंतर आता पक्षफोडी : आ. बाळासाहेब थोरात

आमदार फोडीनंतर आता पक्षफोडी : आ. बाळासाहेब थोरात

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  देशात एकहाती सत्तेचा गैरवापर करीत भाजपाने हुकूमशाही सुरू केली आहे. आमदार फोडीनंतर आता पक्ष फोडी सुरू झाली आहे. लोकशाहीसाठी घातक ठरणारे काम देशात सुरू आहे, असे घणाघाती आरोप माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर केले. तालुक्यातील कानडगाव येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात प्रथमच पाणी आल्यानंतर आ. थोरात व आ. प्राजक्त तनपुरे यांनी लाभार्थी गावांना भेट दिली. कानडगाव येथे निळवंडे कालव्यासाठी योगदान देणार्‍या या दोन्ही नेत्यांवर जेसीबीने पुष्पवृष्टी करीत जल्लोशात स्वागत करण्यात आले. कानडगाव ग्रामस्थांसह सोनगाव, सात्रळ, तांदूळनेर, गणेगाव, चिंचविहिरे, वडनेर, कनगर, तांभेरे, निंभेरे ग्रामस्थांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कानडगावचे पाटीलबा गागरे होते.

आ. थोरात म्हणाले, निळवंडे धरण बांधत असतानाच अनंत अडचणी आणण्याचे काम झाले. एका राजकीय नेत्याने निळवंडे धरणाबाबत 'वांझोटीला मुल होईल, परंतू निळवंडे धरण होणार नाही,' असे सांगत थट्टा केली होती, परंतू तेच नेते आता निळवंडेच्या पाण्याचे पूजन करण्यात आघाडीवर आहेत. 'राहुरी परिसरात 21 गावांमध्ये हुलगे लावण्याची वेळ आणू,' अशी भाषा ज्यांनी केली होती, त्यांना ओळखा. धरणानंतर कालव्याला मान्यता मिळाली, ही मोठी गोष्ट ठरली, परंतू कालवा निर्मितीला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. निळवंडे कालव्यासाठी पाठपुरावा केल्याचे आज समाधान वाटते.

आ. तनपुरे म्हणाले की, 'निळवंडे'चे पाणी आले नाही तर जोड्याने मारा,' असे म्हणणार्‍यांनी 10 वर्षे सत्ता भोगली. आमच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी ते नारळ फोडत आहेत. निळवंडे कालव्यासाठी सर्वाधिक पाठपुरावा आ. थोरात यांनी केला. तीन पिढ्यांच्या संघर्षानंतर निळवंडेचे पाणी राहुरी परिसराला मिळाले. मधुकर महाराज घोरपडे, कालवा कृती समितीचे गंगाधर गमे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक प्रा. सोपान हिरगळ तर सुत्रसंचलन सुदाम संसारे यांनी केले.

जि.प.माजी अध्यक्ष अरूण कडू, प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे, भास्कर कणसे, रविंद्र आढाव, बाळासाहेब खुळे, गोरक्षनाथ पवार, सुभाष डुक्रे, दत्ता कवाणे, मच्छिंद्र सोनवणे, बाळासाहेब आढाव, साहेबराव दुशिंग, किरण कडू, सुजित वाबळे, डॉ. रविंद्र गागरे, डॉ. सुधाकर मुसमाडे, सुनिल शेलार, किरण गव्हाणे, सुखदेव बलमे, सुयोग नालकर, भास्कर गाढे, विजय नरोडे, भगिरथ नरोडे, बाबासाहेब पठारे, मंजाबापू कोबरणे, बापुराव कोबरणे, पुप्पू माळवदे, भारत रोकडे, नवनाथ हारदे, गणेश हारदे, रघुनाथ मुसमाडे, भाऊसाहेब बेलकर, जावेद सय्यद, मच्छिंद्र गागरे, रशिद सय्यद, सितारात गागरे, पांडूरंग लोंढे, संदीप गागरे, ज्ञानदेव गागरे, संजय संसारे आदींसह निळवंडे कालवा लाभार्थ्यांची गर्दी दाटली होती.

जोड्याने मारा म्हणणारे 10 वर्षांनी अवतरले
सन 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने, 'दोन वर्षात निळवंडेचे पाणी आणून न दिल्यास जोड्याने मारा,' असे आश्वासन दिले होते. त्या शब्दावर 10 वर्षे सत्ता उपभोगली. तरी निळवंडेचे पाणी आणता आले नाही. महाविकास आघाडी शासनाच्या काळात जलद कामे झाल्याने निळवंडे कालव्याचे काम पूर्ण झाल्याचे समजताच फुकटचे नारळ फोडण्यासाठी 10 वर्षांनी 'टोपीवाल्यां'नी धाव घेतल्याची खरमरीत टीका आ. प्राजक्त तनपुरे यानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली.

खुट्ट्या घालणार्‍यांना खुट्टी ठोका
जिल्ह्यात काहींनी खुट्ट्या घालण्याचे काम करीत विकास कामांना अडचणी आणल्या, परंतू जनतेने खुट्ट्या ठोकणार्‍यांनाच खुट्ट्या ठोकून काम करणार्‍यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. राहुरी मतदार संघ राज्यात सर्वाधिक मोठा असेल. राहुरी, नगर, पाथर्डी या तीन तालुक्यांमध्ये आ. प्राजक्त तनपुरेंचा झंझावत संगमनेरपर्यंत आला आहे. त्यांच्यासारखा प्रगल्भ लोकप्रतिनिधी लाभला हे राहुरी मतदार संघाचे भाग्य आहे, असे आ. बाळासाहेब थोरात म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news