लोकसभेपूर्वी ‘तनपुरे’ची रणधुमाळी? | पुढारी

लोकसभेपूर्वी ‘तनपुरे’ची रणधुमाळी?

नगर : पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासाठी प्रशासकांकडून हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी 10 लाख रुपये भरल्यानंतर या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालकांनी राज्याच्या सहकार विभागाच्या सचिवांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी पाच वर्षापूर्वी विखे-तनपुरे गटात प्रतिष्ठेची निवडणूक झाली. यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे सभासदांनी कारखान्याच्या चाव्या दिल्या. या कालावधीत संचालक मंडळाने गाळप यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी प्रादेशिक सहसंचालकांनी 32 लाख रुपये भरण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र कारखाना व्यवस्थापनाने संबंधित रक्कम वेळेत न भरल्याने मार्च 2023 पासून महाराष्ट्र शासनाने प्रशासक म्हणून उपनिबंधक गणेश पुरी यांची नेमणूक केली होती. त्यानंतर रातोरात पुरी यांच्याकडून पदभार काढून तो राहुरीचे सहायक निबंधक पराये यांच्याकडे दिला, याचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. आजपर्यंत पराये हेच प्रशासक आहेत.

दरम्यान, आता कारखान्याची निवडणूक घेण्यासाठी 10 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. ही रक्कम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याकडे भरणा करण्यात आली आहे. तसेच 6 फेब्रुवारीला प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर यांनी संबंधित विभागाचे सचिव यांना पत्र पाठवून पुढील मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे आता पूर्ण 32 लाखांची रक्कम भरावी लागेल की कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता 10 लाखांच्या रकमेतच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या भूमिककडे नजरा!
जिल्हा बँकेचे कारखान्याकडे सुमारे 100 कोटींपेक्षा अधिक कर्ज आहे. या वसुलीसाठी बँकेने कारखाना ताब्यात घेतला आहे. त्यामुळे थकीत कर्जाच्या वसुलीबाबत निवडणुकांपूर्वी आणि नंतर बँकेच्या व्यवस्थापनाच्या अर्थात बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले यांच्या भूमिकेला महत्त्व असणार आहे.

डॉ. तनपुरे कारखान्याने 10 लाख रुपये भरले आहेत. त्यामुळे निवडणूक घेण्याबाबत सचिवांकडे मार्गदर्शन मागविले आहे. आज-उद्या मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकांचा कार्यक्रम लागू शकतो.
                                     – डॉ. प्रवीण लोखंडे साखर सहसंचालक, अहमदनगर

राजकीय हालचाली सुरू; विरोधक अलर्ट!
सध्या भरलेल्या 10 लाखांत ही निवडणूक घ्यायची असेल, तर बिनविरोधचा पर्याय असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीचा लवाजमा, यात बूथ, त्यावरील कर्मचारी, छपाई, मतमोजणी इत्यादी खर्च कमी होणार आहे. मात्र शनिवारी एका विरोधी गटाने सभासदांचा मेळावा बोलाविला असून त्यात निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या तरी बिनविरोधची आशा धूसर दिसते.

Back to top button