Nagar : खडका रस्त्यावरील प्रवास खडतरच ! | पुढारी

Nagar : खडका रस्त्यावरील प्रवास खडतरच !

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील खडका रस्त्याची दैना झाली असून, सध्या या रस्त्यावरील प्रवास खडतर बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमपट्टी केली तरी प्रवाशांचा हाल कमी झाले नाहीत. आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी खडका रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. नेवासा-खडका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना हवालदिल केले आहे. या रस्त्यावरून जाताना सर्वांनाच कसरत करावी लागत आहे. नेवासा शहरातून खडका रस्त्याने जाताना मार्केट यार्डपासून काही अंतरावर रस्ता चांगला आहे. बाहेरगावाहून संभाजीनगर मार्गावर जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. अनेक जण या रस्त्याने गेल्यावर काही अंतरावर गेल्यावर त्याची निराशा होते. आतापर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. खड्ड्यांमुळे काहींना जीव गमवावा लागला आहे.

आम आदमी पक्षाने खडका रस्त्यावर वृक्षारोपण करून गांधीगिरी केली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने डागडुजी करून वेळ मारून नेली. खडका रस्ता जैसे थे असून, कोणालाही या रस्त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. आता खासदार सदाशिव लोखंडे यांनीच या खडका रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

निवडणुका आल्या की या रस्त्याची चर्चा होते. अनेकदा बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा झाली. केवळ आश्वासने दिली जातात. आता सर्वपक्षीय आंदोलन करावे लागेल.
                                                                            – अनिल ताके, युवानेते, नेवासा

Back to top button