

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अॅड. आढाव दाम्पत्य हत्याकांड प्रकरणातील आरोपींना आज दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी न्यायालयासमोर हजर केले, तेव्हा त्यांनी पोलिस व सीआयडी पथकावर तसेच कोठडीतील इतर आरोपींवर मारहाणीसह गंभीर आरोप केले. मात्र नंतर घूमजाव करत असे घडले नसल्याचे स्पष्ट केले. आरोपी दत्तात्रय दुशिंग, सागर खांदे, शुभम महाडिक, हर्षल ढोकणे, बबन मोरे यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज राहुरी न्यायालयात हजर केले होते. त्या वेळी आरोपींनी पोलिस व सीआयडी पथकाने बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. कोठडीतील इतर आरोपींनी जबरदस्तीने घाण खायला व मूत्र प्यायला लावले, अशा तक्रारी केल्या. मात्र काही वेळातच पुन्हा न्यायालयासमोर हजर राहून 'तसे काही झाले नाही. आमची कोणतीही तक्रार नाही,' असे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी वाढवून दिली.