

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील नगर-मनमाड रस्त्यालगत असणार्या साई मिडास टस या बिझनेस सेंटरमध्ये असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एचडीबी बँकेच्या कार्यालयास मंगळवारी सकाळी आग लागली. त्यात बँकेतील फर्निचर, कॉम्प्युटर व कागदपत्रे जळून खाक झाली. मनपाच्या अग्निशमन विभागाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. नगर-मनमाड रस्त्यावरील साई मिडास या बिझनेस सेंटर इमारतीच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी सव्वानऊ वाजता आग लागली. वरच्या मजल्यावरील एका कोपर्यात आग लागल्याचे निदर्शनास आल्याने स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली. तोपर्यंत आगीचा भडका झाला होता. धुराचे लोळ परिसरात पसरले होते.
आगीची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, अजिंक्य बोरकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मनपाच्या अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मनपाच्या अग्निशमन विभागाचे तीन बंब व एमआयडीसीचा एक बंब यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीचे रौद्ररूप पाहता इमारतीतील अन्य दुकानांना त्याची झळ बसण्याची शक्यता होती. त्यात इमारतीत बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे दुकाने, हॉस्पिटल, फायनान्स कंपनीचे कार्यालये आहेत. या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर एका फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. त्यामुळे दुकानातील साहित्य तत्काळ हलविण्यात आले.
इमारतीच्या दुसर्या मजल्यावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण उपचार घेत होता. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्या रुग्णालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, वरच्या मजल्यावरील एचडीबी बँकेच्या कार्यालयातील सर्व कागदपत्रे, संगणक, फर्निचर असे साहित्य जळून खाक झाले. इमारतीच्या छतावरील भाग जळून खाली कोसळला. दरम्यान, आग नेमकी कशाने लागली याचा तपशील समजू शकला नाही, अशी माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाने दिली. दरम्यान, आग शमविण्यासाठी अग्निशमनचे शंकर मिसाळ, सूरज घांगुर्डे, सनी धाडगे, सूरज कार्ले, संजय रोकडे यांनी प्रयत्न केले.
स्वास्तिक नेत्रालयाचे नुकसान नाही : डॉ. चौधरी
साई मिडास बिझनेस सेंटरच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या आगीत स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटर्निटी हॉस्पिटल खालच्या मजल्यावर आहेत. त्या आगीत हॉस्पिटलचे कोणतेही नुकसान झालेले नाही. फक्त सर्वत्र धूर पसरला होता. सोशल मिडीयावर चुकीच्या अफवा पसरविण्यात आल्या. स्वस्तिक नेत्रालय अँड मॅटर्निटी हॉस्पिटलने मनपाच्या अग्निशमन दल व अन्य सेफ्टीबाबत उपाययोजना पूर्वीपासूनच केल्या आहेत, अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रफुल्ल चौधरी यांनी दिली आहे.
आग लागल्याची माहिती समजली. त्यामुळे तत्काळ घटनास्थळी दाखल झालो. अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांसह आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
– संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस