जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ... !!! | पुढारी

जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ... !!!

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात 94 गावे व 32 वाड्यांमध्ये जलजीवन मिशनची कामे हाती घेतली. या योजेनेत अनेक ठिकाणी पाण्याचा स्त्रोत नाही. कामांची गती संथ असल्याचे दिसते. काही कामे सुरुच झाली नाहीत. कामे होणार्‍या काही गावकर्‍यांना उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे कामे तातडीने सुरु करावी. बहुतांश भागात पाईपलाईनसह पाण्याच्या टाक्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचे मोबाईलमध्ये फोटो दाखवून या निकृष्ट कामांचा पंचनामा संरपचांसह ग्रामसेवकांनी आ. डॉ. किरण लहामटे व अधिकार्‍यांसमोर केल्याने जलजीवनच्या कामांचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यातील जनतेला पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन नळ योजनेच्या कामाना सुरवात झाली. ‘हर घर जल 2024’ संकल्पना आहे. यानुसार भारत सरकारने 2024 सालापर्यंत सर्व कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे व सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला प्रतिव्यक्ती 55 लिटर पाणी देण्याचा सरकारचा मानस आहे. राज्य शासनाने पाणी पुरवठा विभागामार्फत योजना ग्रामीण भागात राबविण्यास कंत्राटदार नेमले. कामे करवून घेतली जात आहेत, मात्र कंत्राट एकाच्या नावे तर काम करून घेणारे दुसरेच, यामुळे कामाला दर्जा राहिला नाही. कामे कासवगतीने होत आहेत. बहुतांश कामे थंड अवस्थेत आहेत. या योजनेंतर्गत काही गावांत अद्याप टाक्या उभ्या झाल्या नाहीत. पाईप टाकण्याची कामे सुरू आहेत.

उन्हाळ्यापर्यंत कामे पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे. जलजीवन मिशनांतर्गत कामांची गती वाढली नाही. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे निदर्शनास आल्यावर आ. डॉ. लहामटे यांनी ‘जल जीवनमय’ ठेकेदार व अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. तालुक्यात अनेक गावांमध्ये जल जीवन योजनेचा सर्वे चुकीच्या पद्धतीने झाला आहे. प्रस्ताव चुकीचे करण्यात आले. योजनेची माहिती गावांना मिळत नाही. काम सुरू झाली नाहीत. जल जीवन कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाल्याने ठेकेदार झाले आमचे गुरु, असे बोल सरपंचांनी सुनावले. यावेळी कार्य. अभियंता लोहरे, ग.वि. अधिकारी पांडुरंग कोल्हे, प्र. उ. अभियंता सुनील सांळुके, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी आढावा घ्यावाः आ. डॉ. लहामटे
अकोले तालुक्यातील गावांसह वाड्या-वस्त्यांना जल जीवनचे पाणी मिळाले पाहिजे. नवे रस्ते खोदु नका. देश आपला आहे, असे वाटून ठेकेदाराने कामे केली पाहिजे. पाईपवर न ठेवता जमिनीत गाडा. जल जीवनच्या आढावा बैठकीत उपस्थित न राहणार्‍या ठेकेदारावर कारवाई करा. कामे सुरु असलेल्या गावांसह वाड्या- वस्त्यांवर कामाचा आढावा घ्या, अशा सूचना आ. डॉ. किरण लहामटे यांनी यावेळी केल्या.

Back to top button