कामाचा जाब विचारत भाजप खासदारांच्या कार्यक्रमात गोंधळ

कामाचा जाब विचारत भाजप खासदारांच्या कार्यक्रमात गोंधळ

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे भाषण सुरू असतानाच नागरिकांनी ' पाच वर्षातील विकास कामांचा जाब विचारला. यावरून एकच गोंधळ झाला. आ. मोनिका राजळे यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही गोंधळ सुरूच होता. अखेर खा. विखे यांनी गावातील विकास कामांची माहिती देत कार्यक्रम अटोपता घेतला. ज्या गावात हा गोंधळ झाला ते गाव भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांचे आहे. पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे खासदार विखे व आमदार राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचा प्रारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदारांचे भाषण सुरू असताना उपस्थितीत शेतकर्‍यांनी 'तुम्ही आमच्या गावात काय विकास केला, हे सांगा? असा सवाल करत निघून जा, असा शब्दप्रयोग केला.

प्रश्नांची सरबत्ती करत कार्यक्रमात गोंधळास सुरूवात झाली. हे पाहून आमदार मोनिका राजळे व्यासपीठावरून उठून लोकांत पोहचल्या. त्यांनी शांततेचे आवाहन करताना खासदार विखे यांचे ऐकून घ्या, अशी विनंती केली. त्यानंतरही लोकांकडून प्रश्न विचारलेच जात होते. खासदार म्हणून तुम्ही पाच वर्षात काय केले सांगा, असा सवाल येथील काही ग्रामस्थ, शेतकरी व नागरिकांनी विखे यांना केला.
तुमच्या योजना येऊन द्या मगच बोला, अशी भूमिका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले होते. बराच वेळ हा गोंधळ सुरू होता. एका बाजुला खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उभा होते, तर दुसर्‍या बाजुला गावातील काही ग्रामस्थ त्यांच्यासमोर बसलेले तसेच नेत्यांभोवताली तिन्ही बाजुने ग्रामस्थ उभे असताना हा गोंधळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदान केले, बोलू द्या..!
आमदार राजळे यांनी खासदारांना बोलू द्या, अशी वारंवार विनंती गोंधळ घालणार्‍या लोकांजवळ जाऊन केली, मात्र आम्हाला गप्प करू नका, बोलू द्या, अशीच भूमिका या लोकांची होती. काही ग्रामस्थांनी समजूतदारपणाची भूमिका घेत गोंधळ घालणार्‍यांना समजाविण्याचा प्रयत्न केला, परंतू ते संतप्त झाल्याने प्रश्न विचारण्याचे काही थांबले नाही. शेतीसाठी पाणी देतो म्हटले होते, त्याचं काय झालं? आम्ही मतदान केलेला आहे आम्हाला बोलू द्या असे ते म्हणत होते.

सहा महिन्यात पाणी, हा माझा शब्द..!
आता मी तुमचे ऐकून घेतल आहे. शांत रहा, मला बोलू द्या, तुम्ही शांत नाही राहिले तर मी कसं बोलू शकेल, असे म्हणून खासदार विखे यांनी भालगाव व परिसरात झालेल्या विकास कामांचा पाढा लोकांसमोर वाचला. विखे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी कालावधी पाणी योजनेचे काम मंजूर करून दिले जात नव्हते. आपलं सरकार आल्यानंतर काम मंजूर झाले. पाणी योजनेच्या कामाला सुरुवात झाली असून सहा महिन्यात तुम्हाला पाणी मिळेल, असा मी तुम्हाला असा शब्द देतो. खासदार म्हणून काय विकास केला? या प्रश्नाला विखे यांनी विकास कामांची यादी वाचून दाखवत उत्तर दिले.

गावांतर्गत संघर्षाची ठिणगी
भालगाव हे भाजपचे विद्यमान तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांचे गाव असून तेथेच खासदारांच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. तालुका व गाव पातळीवर राजकारणात गावातील अनेक सक्रिय आहेत. त्यातील काही भाजपचे तर काही आ. राजळे यांचे कट्टर समर्थक आहेत. या समर्थकांचा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून खेडकर यांच्याशी संघर्ष सुरूच असतो. भालगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच संघर्षाची ठिणगी या कार्यक्रमात पडल्याची चर्चा गावात सुरू होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news