माझ्या नशिबात राजयोग; बाकीच्यांनी स्वप्न बघायची : नीलेश लंके | पुढारी

माझ्या नशिबात राजयोग; बाकीच्यांनी स्वप्न बघायची : नीलेश लंके

पारनेर: पुढारी वृत्तसेवा :  माझ्या नशिबातला राजयोग कोणी खेचू शकत नाही. तू जोपर्यंत कंटाळणरा नाही, तोपर्यंत तूच राहणार आहे, असे मला एकाने सांगितल्याची भविष्यवाणी करतानाच बाकीच्यांनी फक्त स्वप्न बघायची असे डिवचत आता तिकडल्यांची जिरवायची, असा निर्धार राष्ट्रवादीचे आ. नीलेश लंके यांनी केला. पारनेर तालुक्यातील गारखिंडी व कळस येथील कार्यक्रमात ते बोलत होते. आ. नीलेश लंके यांच्याकडे संभाव्य लोकसभेचा उमेदवार म्हणून पाहिले जात असून त्यादृष्टीने त्यांनी पुन्हा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात लंके हे लोकसभा लढतील की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. मात्र आता त्यांनी नामोल्लेख टाळत भाजप खा. डॉ. सुजय विखे यांच्यावर निशाणा साधल्याने लंके यांनी त्यांची भूमिका जवळपास स्पष्ट केल्याचे चित्र दिसते आहे.

मी काही गुळ शेंगादाणे वाटणार्‍यातला नाही. मी काम करणार्‍यातला आहे. पाच वर्षांनी फिरकणारा नाही. नाहीतर काही राजकीय लोकं डायरेक्ट पाच वर्षांनीच गावात येतात. परत पाच वर्षात त्यांच्याकडे बघायला वेळ नाही, या शब्दात नामोल्लेख टाळत त्यांनी विखेंवर निशाणा साधला. इथे काही अडचण आली तर मी सेवेत सदैव आहे. काही अडचण आली तर तुम्ही हक्काने येवू शकता. नाहीतर डफडे वाजवणारे अमूक साहेबांचे गुळ शेंगदाणे आले असे सांगणारे आहेत. त्यांच्यावर काही विश्वास ठेवू नका, मी आमदार झालो, माझ्या अगोदर सहा महिने ते खासदार झाले. त्यांनी गावात काही कामे दिली का?, रुपयांचेही काम दिले नाही. मोठ्या लोकांच्या काही नादी लागू नका, आपलं ते आपलं असतं. कान धरता येतो. हक्काने सांगता येतं. हे विसरू नका, त्यांनी चार/सहा हाताशी धरले. लोकसभा झाली की त्यांचे डफडे सुध्दा काढून घेणार असा इशारा देतानाच कर्तव्य शून्य, मोठ्या गप्पा मारणे, व्यासपीठावर भाषण ठोकणारे अशी शेलकी विश्लेषणे त्यांनी खासदारांना लगावली.

माझ्या नशिबातला राजयोग कोणी खेचू शकत नाही. तू जोपर्यंत कंटाळणरा नाही, तोपर्यंत तूच राहणार असे एकाने सांगितल्याची भविष्यवाणीही लंके यांनी सांगितली. बाकींच्या नेत्यांसारखे नुसत्या गप्पा मारत नाही. जे करतो तेच बोलतो. नीलेश लंकेंनी सात कोटींचा निधी दिला, तुमचं काय, सात लाख तर द्या, अशी मागणी त्यांच्याकडे करा. आता 20 कोटींच्या कामाचे उद्घाटन करणार आहे. सत्तेचा गैरवापर करून एकमेकांची जिरवाजिरवी करत नाही. तालुक्याच्या स्वाभिमानासाठी एक व्हा, असे आवाहन आ. लंके यांनी पारनेरकरांना केले.

Back to top button