Crime news : महाविद्यालयातील प्राध्यापकाला मारहाण | पुढारी

Crime news : महाविद्यालयातील प्राध्यापकाला मारहाण

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत तालुक्यातील आदिनाथनगर येथील दादा पाटील राजळे महाविद्यालयातील प्राध्यापकाला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्याची घटना घडली. याबाबत प्रा.अतुल चौरपगार यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी सात तरुणांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. चौरपगार हे 25 जानेवारी रोजी कॉलेजमधून घरी जात होते. त्यावेळी त्यांना एक कॉल आला व तुम्ही माझ्या बहिणीला कॉलेजमध्ये होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात रामाच्या गाण्यावर का डान्स करू देत नाही? अशी विचारणा संबंधिताने केली. 26 जानेवारीला काही तरुण कॉलेजमध्ये आले व त्यांना प्राचार्यांच्या केबिनमध्ये बोलून घेण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डान्स का करून देत नाही? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. त्यावर याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे चौरपगार यांनी सांगितले.
त्यानंतर या तरूणांनी त्यांच्या मोबाईलमधील एक स्क्रीन शॉट दाखवून, तुम्ही यापूर्वी आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. चौरपगार यांना जातीवाचक शिवीगाळ करून जबरदस्तीने लेखी माफी नामा द्या व तुमच्या व्हॉटस् अ‍ॅप स्टेटसला ठेवा, असे तरुणांनी सांगितले. यानंतर प्राचार्यांच्या सांगण्यावरून व महाविद्यालयाचे नाव खराब होऊ नये, यासाठी प्रकरण मिटवा असे म्हणत माफीनामा लिहून दिला.

यातील काही जणांनी चौरपगार यांना जातीवाचक शिवीगाळ केली व कॉलेजमधील काचा व कुंड्या फोडल्या. त्यानंतर कॉलेजमधील ओळखीच्या काही लोकांनी त्यांना गेटवर नेऊन माफी मागा, तुम्हाला त्रास होणार नाही, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून चौरपगार यांनी कॉलेजच्या गेटवर जात जमलेल्या लोकांची माफी मागितली. यावेळी दत्तात्रेय बापू दारकुंडे, सचिन बाळासाहेब राजळे, शुभम अर्जुन नेहूल, अशोक कुटे, अविनाश सुखदेव काळे, अभिषेक अरुण कचरे, दत्तात्रेय राजेंद्र कचरे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार घडूनही धमकीचे फोन आल्याचे चौरपगार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील करीत आहे.

दरम्यान, या विषयावर सोमवारी पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये संस्थाचालक आमदार मोनिका राजळे यांचा निषेध करण्यात आला. त्यांना गावोगावी काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी रवींद्र म्हस्के, दिगंबर गाडे, अरविंद सोनटक्के, वसंत बोर्डे, सुनील जाधव, आकाश दौंडे, समाधान आराख, रोहिणी ठोंबे, संजय कांबळे, महिंद्र राजगुरू, सूरज क्षेत्रे, प्यारेलाल शेख, अशोक सिरसिम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Back to top button