‘बिंगो’ सुरू ठेवण्याचा पोलिसांचा अट्टहास | पुढारी

‘बिंगो’ सुरू ठेवण्याचा पोलिसांचा अट्टहास

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पोलिस महासंचालकांकडे दाद मागणार असून बिंगो जुगार चालू ठेवण्याचा अट्टाहास करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. शेवगाव शहरासह तालुक्यात जुगार, मटका, चक्रीचा बिंगो जुगार असे अवैद्य धंदे जोमाने सुरू आहेत. गत काही दिवसांपासून हे सर्व व्यवसाय बंद झाले होते. मात्र, शेवगाव पोलिस ठाण्यात नवीन पोलिस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हे अवैध व्यवसाय पुन्हा हळूहळू सुरू झाले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. भर चौकांचौकात, गल्लोगल्ली थैमान मांडले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक, विद्यार्थी, महिलांना मोठा त्रास होत असताना पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत.

चक्री बिंगो जुगारावर कारवाई करुन तो बंद व्हावा व उद्ध्वस्त होणारे संसार वाचविण्याची भूमिका पोलिसांनी घेणे महत्त्वाचे असताना उलट हा जुगार चालू राहावा किंबहूना त्यात वाढ व्हावी, असा त्यांचा अट्टाहास चालू आहे. आजमितीला 50 ते 60 एवढया प्रमाणात बिंगो जुगार चालू आहेत. यातून पोलिसांना मोठी कमाई मिळते, असा आरोप केला जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेला याची माहिती असताणा ते ही यावर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अवैध व्यवसाय बंद करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, अरविंद साळवे, बन्नू शेख, रवींद्र निळ, शरद अंगारखे, सुरेश निळ आदींनी दिला.

Back to top button