राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याकडून जि. परिषदेतील पाणीपुरवठा विभागाची तोडफोड | पुढारी

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याकडून जि. परिषदेतील पाणीपुरवठा विभागाची तोडफोड

नगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन योजनेची कामे निकृष्ठ दर्जाची सुरू आहेत. याविषयी जिल्हा परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे यांनी पाणी पुरवठा विभागात तोडफोड करून प्रशासनाचा निषेध केला. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून, पोटे यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास प्रकाश पोटे हे झेडपी परिसरात आले. त्यांनी आपल्या वाहनातून लाकडी दांडके हातात घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी हातात लाकडी दांडके घेऊन आलेले पोटे यांना पाहताच कर्मचारी बाहेर पळाले.

पोटे यांनी काचाच्या खिडक्या, दरवाजाची तोडफोड केली. पाणीपुरवठा विभागाच्या केबिनच्या दरवाजाला लाथ मारून ते कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे यांच्या दालनात पोहचले. तेथेही दांडक्याने टेबलवरील काच, खिडक्या आणि समोरील खुर्चीची तोडफोड करून प्रशासनाचा निषेध नोंदविला. यावेळी सुरक्षा रक्षकही दूरच थांबलेले दिसले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच गोंधळ उडाला होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना पोटे म्हणाले, जिल्ह्यात जलजीवनचे कोट्यवधीचे कामे मातीमोल सुरू आहेत.

एक-एक दीड-दीड फुटावर पाईप गाडले जात आहेत. कोल्हेवाडी, हातवळण आणि भातोडी येथील कामांबाबत आपण जिल्हा परिषदेला याचे पुरावे दिले. तीन महिने झाले, तरी प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. कार्यकारी अभियंता फोन उचलत नाहीत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज मला नाईलाजाने अशाप्रकारे आंदोलन करावे लागले. तसेच तोडफोडीनंतर ते स्वतः त्याच कार्यालयात ठिय्या देवून बसले.

सहा जणांवर गुन्हा; पोटे यांना अटक

या तोडफोड प्रकरणी प्रकाश पोटे यांच्यासह सहा जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, सरकारी मालमत्तेचे विद्रुपीकरण असा कमलान्वये कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अभियंता विनोद देसाई यांनी पोलिसांत फिर्याद दिली. रात्री उशिरा प्रकाश पोटे स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button