Pimpri : कोट्यवधीचा खर्च करूनही प्राणिसंग्रहालय भकास | पुढारी

Pimpri : कोट्यवधीचा खर्च करूनही प्राणिसंग्रहालय भकास

मिलिंद कांबळे

पिंपरी : संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयास गेल्या सात वर्षांपासून टाळे आहे. संग्रहालयाच्या नूतनीकरणावर तब्बल 20 कोटींचा खर्च करूनही तेथील चित्र भकास आहे. कामाचा दर्जा सुमार असल्याने अनेक ठिकाणी गळती लागली आहे. तर, कासव विभागात पावसाचे पाणी साचले आहे. अनेक महिने बंद स्थितीतील या कामाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा कोट्यवधींचा भार महापालिकेस सहन करावा लागणार आहे. सात एकर क्षेत्रातील या प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम बी. के. खोसे या ठेकेदारामार्फत 20 मे 2026 ला सुरू झाले.

पहिल्या टप्प्यात तब्बल 13 कोटी 74 लाखांचे काम 9 मार्च 2019 ला पूर्ण झाले. या कामाची मुदत 24 महिने असताना 36 महिने लागले. दुसर्‍या टप्यातील कामही याच ठेकेदाराला देण्यात आले. ते काम 5 सप्टेंबर 2019 ला सुरू होऊन 29 डिसेंबर 2021 ला संपल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यासाठी 6 कोटी 24 लाखांचा खर्च झाला. आतापर्यंत नूतनीकरणावर तब्बल 20 कोटींचा खर्च करूनही ते संग्रहालय दोन वर्षांपासून बंदच आहे. संग्रहालय परिसरात सर्वत्र झाडीझुडपे उगवली आहेत. देखभालीअभावी अनेक झाडे करपली आहेत. काही झाडे तोडून टाकली आहेत. सर्वत्र कचरा साचला आहे.

कामाचा दर्जा सुमार असल्याने अनेक ठिकाणी गळती लागली आहे. कासव व मासे विभागात पावसाचे पाणी साचले आहे. सर्प विभागात सूर्यप्रकाश व्यवस्थेसाठी लावण्यात आलेल्या काचा अस्वच्छ झाल्या आहेत. तसेच, पक्षालयाच्या सुरक्षा जाळ्या गंजत आहेत. परिसरात भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार आहे. आवारात दारूच्या बाटल्याचा खच पडला आहे. प्रवेशद्वाराची सजावट काही ठिकाणी तुटली आहे. तेथील जुने बांधकाम धोकादायक स्थितीत असून, ते कधीही ढासळू शकते. त्यातच 52 सर्प, 83 पक्षी, 2 मगर व 47 कासव ठेवण्यात आले आहेत. कमी जागा असल्याने त्या प्राण्यांचा अक्षरश: कोंडमारा होत आहे. याच कारणांमुळे येथील विविध 36 पक्षी, प्राणी व सर्पांचा मृत्यू झाल्याचा आरोप हिवाळी अधिवेशनात करण्यात आला. ते मृत्यू नैसर्गिक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

आता महापालिकेऐवजी राज्य सरकारकडून संचालन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्राणिसंग्रहालय राज्य शासनाच्या वन विकास महामंडळाकडे दिले आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय महापालिकेऐवजी महामंडळ चालविणार आहे. त्यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली आहे. नूतनीकरणाचे सर्व काम पूर्ण करून महापालिका महामंडळाच्या ताब्यात हे संग्रहालय देणार आहे.

पालिकेचे ठेकेदाराला अभय

नूतनीकरणाच्या कामास विलंब झाला आहे. कासवगतीने हे काम पूर्ण झाले आहे. त्याचा दर्जा सुमार असल्याचे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करणे अपेक्षित होते. महापालिकेने केवळ आर्किटेक्ट पंकज जैन अ‍ॅण्ड जैन असोसिएटसवर कारवाई करीत त्याची नियुक्ती रद्द केली आहे. आता नवीन आर्किटेक्ट नेमण्यात आला आहे.

सापांचा वावर असल्याने कर्मचार्‍यांमध्ये भीती

प्राणिसंग्रहालयाच्या आवारात प्रचंड प्रमाणात झाडीझुडपे उगवली आहेत. तेथून पायी चालणेही अवघड झाले आहे. संग्रहालयाच्या परिसरात मोकळी जागा तसेच, हिरवळ आहे. त्यामुळे या भागात सर्प आढळून येत आहे. पर्यायाने कर्मचार्‍यांना सर्पदंशाचा धोका आहे.

प्राणिसंग्रहालयात तिसर्‍या व अखेरच्या टप्प्यातील काम करणे बाकी आहे. त्यासाठी 15 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पूर्वीची निविदा रद्द केली आहे. नवीन निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी 15 महिन्यांचा कालावधी लागेल.

-मनोज सेठिया, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

हेही वाचा

Back to top button