एमआयडीसी होऊ नये यासाठी बैठका : आमदार रोहित पवार | पुढारी

एमआयडीसी होऊ नये यासाठी बैठका : आमदार रोहित पवार

जामखेड : पुढारी वृतसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी महत्त्वाची असणारी एमआयडीसी होऊ नये, यासाठी मंत्रालयात बैठका झाल्या आहेत, ही खेदाची बाब आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केली. मात्र, एमआयडीसी होण्यासाठी वेळ पडल्यास कायदेशीर लढाई देखील लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जवळा येथील नांदणी नदीवरील पुलाची पाहणी करताना आमदार पवार बोलत होते. जवळा येथे विविध ठिकाणी भेटीगाठी घेत ग्रामस्थ व शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मतदारसंघात विकासकामांना ब्रेक लावण्यासाठी मंत्रालयात बैठका घेत, निधीबाबत अडवाअडवी केली जात आहे.

महायुतीचे सरकार येताच मतदारसंघासाठी आणलेल्या 450 कोटींच्या निधीतील कामांना ब्रेक लावला. परंतु, सरकारच्या विरोधात न्यायालयात धाव घेत हा निधी शासनाकडून मिळविला आहे. हा निधी सर्वसामन्य जनतेच्या हितासाठीच वापरत असताना, शासनाने त्या निधीला खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी विविध विभागांचा निधी कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. निधीला कात्री लावत आहे. त्यामुळे हे जनतेच्या हिताचे सरकार नसल्याचा घणाघात आमदार पवार यांनी केला.
यावेळी मुरलीधर हजारे, सूर्यकांत मोरे, दीपक पाटील, शरद शिंदे, हनुमंत पाटील, रमेश आजबे, हरिदास हजारे, गणेश चव्हाण, समीर शेख, उत्तम कोल्हे, बाबासाहेब लेकुरवाळे, दिलीप हजारे, संदीप कोल्हे यांच्यासह चोभेवाडी शिवारातील शेतकरी उपस्थित होते.

दुधाला 35 रूपये भाव द्यावा

दुधाला 5 रूपये अनुदान मिळण्यासाठी तारेवरची कसरत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांना जनावरे जगविण्यासाठी चारा विकत घ्यावा लागणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दुधाला अनुदान देण्याऐवजी सरसकट 35 रूपये भाव देण्याची मागणी आमदार पवार यांनी केली.

स्वखर्चाने टँकर सुरू करणार

प्रशासनाने दुष्काळी भागात दहा दिवसांत पाण्याचे टँकर सुरू न केल्यास, आपण स्वखर्चाने मतदारसंघात ग्रामस्थांसाठी टँकर सुरू करणार आहोत. निवडणुका असो किंवा नसो, मी जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार असल्याचे यावेळी आमदार पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button