अवकाळीमुळे ज्वारी, गहू, कांदा, हरभरा धोक्यात | पुढारी

अवकाळीमुळे ज्वारी, गहू, कांदा, हरभरा धोक्यात

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी बुधवारीदेखील जिल्हाभरात अवकाळी पावसाची सततधार सुरुच होती. याचा फटका ज्वारी, गहू आणि हरबरा तसेच फळबागांना बसला आहे. मंगळवारी जिल्ह्यात सरासरी 6.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. नेवासा तालुक्यात सर्वाधिक 17.5 मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे नेवासा तालुक्यातील पाच गावांतील 160 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, तूर, गहू आणि कांदा पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारपासून कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू आहे.

शुक्रवारी नगर तालुक्यातील 23.5 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. मंगळवारीदेखील सर्वदूर अवकाळी पावसाची नोंद झाली. नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रूक, मुकिंदपूर, कुकाणा, भेंडा, वडाळा बहिरोबा, शिंगणापूर, सोनई, देवगड, घोडेगाव, शिरसगाव, भानसहिवरा, देवगाव, गोंडेगाव, सलाबतपूर, खडका फाटा, जळका, गोगलगाव, गळनिंब, दिघी, बाभूळखेडा आदी गावांत पाऊस झाला.
या तालुक्यात सर्वाधिक सरासरी 17.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील वडाळा महसूल मंडलात 41 मि.मी., चांदा आणि घोडेगाव मंडलात प्रत्येकी 30, नेवासा खुर्दमध्ये 14.8 मि.मी. पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील पाच गावांतील 160 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठविला आहे.

मंगळवारी झालेल्या पावसाने जिल्हाभरातील 70 महसूल मंडलांत हजेरी लावली. कमीत कमी 0.5 ते जास्तीत 41 मि.मी. पाऊस झाला आहे. बुधवारी सकाळपासूनच नगर व परिसरात पावसाची संततधार सुरू होती. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. जिल्ह्यातदेखील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळीमुळे ज्वारी, गहू, हरबरा, कांदा आदी पिकांचे नुकसान होत आहे.

304 शेतकर्‍यांना नुकसानीचा फटका
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई, मोर्याचिंचोरे, वांजोळी, झापवाडी व लोहगाव या पाच गावांतील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे या गावांतील 304 शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे.

मंगळवारचा तालुकानिहाय पाऊस
नगर 14.3, पारनेर 7.5, श्रीगोंदा 7.9, कर्जत 0.6, जामखेड 1.2, शेवगाव 12.8, पाथर्डी 8.4, नेवासा 17.5, राहुरी 2.8, संगमनेर 0.6, अकोले 00, कोपरगाव 0.7, श्रीरामपूर 2.1, राहाता 0.2. (मि.मी.)

मंगळवारचा पाऊस
जेऊर मंडल 39.3, केडगाव 20, सावेडी 16.3, कापूरवाडी 14.8, चास 17, सुपा 14.8, एरंडगाव 26.5 ((मि.मी.)

Back to top button