रोहित पवारांवरील कारवाई सूडबुद्धीने : माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत | पुढारी

रोहित पवारांवरील कारवाई सूडबुद्धीने : माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने टाकलेल्या धाडी पूर्णपणे राजकीय हेतूने व सूडबुद्धीने टाकल्या आहेत. हे कृत्य केंद्र व राज्य सरकार यांनी एकत्रित केले असून, आ. पवार यांचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, तरी तो दबला जाणार नाही, असे प्रतिपादन कर्जत यांनी केले. या वेळी शहराध्यक्ष सुनील शेलार, गटनेते संतोष मेहेत्रे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर, उपगटनेते सतीश पाटील, शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, नगरसेवक भास्कर भैलुमे, भाऊसाहेब तोरडमल, रवींद्र सुपेकर, राजेंद्र पवार, भूषण ढेरे, नवनाथ धांडे, विलास धांडे, अशोक धांडे, दादा चव्हाण, अशोक धांडे, नाना साबळे, सचिन मंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज (शनिवार) कर्जत बंदची हाक देण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासून बंद होते. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सकाळी 11 वा. छत्रपत्री शिवाजी महाराज चौकापासून कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत आ. रोहित पवार आणि बारामती अ‍ॅग्रोवर झालेल्या ईडी कारवाईचा पदाधिकार्‍यांनी निषेध नोंदविला. केंद्र आणि राज्य सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी नामदेव राऊत म्हणाले की, बारामती अ‍ॅग्रो कारखाना यंदा उसाला चांगला भाव देत आहे आणि याचा फटका इतर कारखान्यांना बसत असल्यामुळे तो राग मनात धरून व त्यांचे कारखाने संकटात सापडतील आणि जर बारामती अ‍ॅग्रो बंद झाला तर कमी दर देऊन शेतकर्‍यांचा ऊस घेता येईल अशा पद्धतीचे राजकारण डोक्यात ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. आ. पवार यांनी राज्यामध्ये युवा संघर्ष यात्रा काढली. त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून राज्य आणि केंद्र सरकारने त्यांना रोखण्यासाठीच सूड भावनेतून व राजकीय हेतूने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा

Back to top button