भाजपचा खासदार झाल्यास शिरूरचे प्रश्न सुटतील : आ. महेश लांडगे | पुढारी

भाजपचा खासदार झाल्यास शिरूरचे प्रश्न सुटतील : आ. महेश लांडगे

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : शिरूरमधून लोकसभेला उमेदवार कोण असेल माहीत नाही, त्यामुळे उमेदवार न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहणारा खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून देण्याचा आमचा निश्चय आहे. आमच्या दृष्टीने व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. पक्षाचा निर्णय अंतिम असेल. कमळाच्या चिन्हावरील खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला तर या मतदारसंघातील रखडलेले प्रश्न सुटतील, असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले. भाजपाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक नियोजन समितीची बैठक (दि. 5) संतोषनगर-भाम येथील जिल्हा कार्यालयात पार पडली.

या वेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणूक नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होती. या समितीमध्ये एकूण 60 लोकांचा समावेश असून, निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी आणि त्याचे कामकाजाचे वाटप या वेळी करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आयोजित केलेल्या बैठकीस शिरूर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक व प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, निवडणूक प्रमुख प्रदीप कंद, आशा बुचके, जयश्री पलांडे, विकास डोळस, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, ताराचंद कराळे, लोकसभा विस्तारक श्रीकृष्ण देशमुख, राम गावडे, राजेश कोरेकर, संदीप सातव, प्रवीण काळभोर, सुदर्शन चौधरी, राजेश काळे, प्रमोद बाणखेले आदींसह जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रातील नेते लवकरच या नियोजन समितीबरोबर बैठक घेऊन लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती बुट्टे पाटील यांनी दिली. आभार सरचिटणीस संजय रौधळ यांनी मानले.

हेही वाचा

Back to top button