Crime news : 20 तोळे सोन्याचे दागिने लंपास | पुढारी

Crime news : 20 तोळे सोन्याचे दागिने लंपास

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : घराला कुलूप लावून कुटुंबासह नातेवाईकांच्या साखरपुड्याला गेलेल्या किराणा विक्रेत्याचे घर फोडून चोरट्यांनी लोखंडी तिजोरीत ठेवलेले तब्बल 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 50 हजारांची रोकड असा ऐवज तिजोरीसह चोरून नेल्याची घटना नगर एमआयडीसी परिसरातील जिमखाना जवळील माताजी नगर येथे शनिवारी (दि.30) रात्री घडली.
याबाबत सुजय सुनील गांधी (वय 33, रा. माताजी नगर, जिमखाना, एमआयडीसी) एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.शनिवारी (दि.30) रात्री साखरपुडा असल्याने गांधी कुटुंबीय रात्री 8 वाजता घराला कुलूप लावून केशर गुलाब मंगल कार्यालयता गेले होते. तेथून कार्यक्रम आटोपून सर्वजण रात्री 11.55 वाजता घरी आले असता त्यांना घराचे गेट उघडे दिसले.

त्यानंतर त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, घराच्या मुख्य दरवाजाला लावलेले कुलूप तोडलेले दिसले. दरवाजाला कडी लावलेली दिसली. त्यानंतर कड़ी उघडून आतमध्ये प्रवेश करुन हॉलमधील शोकेशचे कप्प्यामध्ये ठेवलेली लोखंडी तिजोरी पाहिली असता ती तेथे दिसली नाही. त्यानंतर घरातील इतर खोल्यांमध्ये सामानाची उचकापाचक केल्याचे दिसून आले. चोरट्यांनी नेलेल्या तिजोरीत तब्बल 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 2 लाख 50 हजारांची रोकड असा ऐवज होता, असे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
गांधी यांनी एमआयडीसी पोलिसांना फोन करून ही माहिती दिली. माहिती मिळताच रात्र गस्तीवरील पथकाने घटनास्थळी पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक पाठक यांनी ही पथकासह जाऊन घटनास्थळी भेट दिली.

Back to top button