प्रशासकराज सुरू ! नगर महापालिकेला निवडणूक आयोगाचे पत्र

प्रशासकराज सुरू ! नगर महापालिकेला निवडणूक आयोगाचे पत्र
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अहमदनगर महापालिकेच्या पदाधिकार्‍यांची पंचवार्षिक मुदत 27 डिसेंबर 2023 रोजी संपल्याचे पत्र राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला आणि प्रशासनाने लगेच महापालिकेच्या सर्व पदाधिकार्‍यांना पाठविले. त्यामुळे महापालिकेत आजच म्हणजे गुरुवारपासून प्रशासकराज सुरू झाले. मात्र, अद्याप प्रशासक म्हणून स्वतंत्र नेमणूक झाली नसल्याने सध्याच्या आयुक्तांकडेच पदभार राहतो, की अन्य कोणी प्रशासक येतो, याकडे नगरकरांचे लक्ष आहे. दुसरीकडे आजची (गुरुवार) स्थायी समितीची बैठक व उद्या (शुक्रवारी) होणारी अखेरची महासभा मुदत संपल्याने आपोआप रद्द ठरली.

अहमदनगर महापालिकेची स्थापना 30 जून 2003 मध्ये झाली. सुरुवातीला तीन महिने तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांच्याकडे प्रशासक म्हणून मनपाचा कारभार होता. त्यानंतर दर पंचवार्षिक निवडणुकीला महापौर व उपमहापौर पदाधिकार्‍यांची निवड झाली. विद्यमान महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांची मुदत 31 डिसेंबरपर्यंत असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच निवडणुकीच्या हालचाली होणे अपेक्षित होते. परंतु, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही. आता थेट लोकसभा झाल्यानंतरच मनपा निवडणुकांना मुहूर्त मिळेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. 31 डिसेंबरला महापालिकेची मुदत संपत असल्याने नगरसेवकांनी कामे मंजूर करण्याचा सपाटा लावला होता.

शेवटी 28 आणि 29 डिसेंबरला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अजेंडा काढला होता. परंतु, काल रात्री राज्य निवडणूक आयोगाकडून मनपाला पदाधिकार्‍यांची मुदत संपल्याचे पत्र आले. त्याच पत्रात प्रशासक नेमणुकीबाबत शासनाला कळविण्यात आले. त्यामुळे पदाधिकार्‍यांना कोणतीही बैठक, सभा घेता येणार नाही, असेही कळविले. त्यामुळे नगरसेवकांचा हिरमोड झाला असून शेवटच्या सभेत हातघाईने मंजूर करण्याचे विषय आता रखडणार असल्याने सदस्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

मनपात दुसर्‍यांदा प्रशासक
महापालिका स्थापन झाल्यानंतर निवडणुका होईपर्यंत तीन महिने महापालिकेवर प्रशासकराज होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा यांच्याकडे प्रशासकपदाचा पदभार होता. मनपाच्या इतिहासात दुसर्‍यांदा म्हणजे 2003 नंतर 2024 ला महापालिकेमध्ये पुन्हा एकदा प्रशासकराज सुरू झाले. 1 जानेवारी 2024 रोजी सुरू होणारे प्रशासक राज कधी संपेल याची कोणालाही माहिती नाही, असे सांगितले जात आहे.

आपल्या हातून पाप नको म्हणून…
गेल्या पंधरा दिवसांपासून पदाधिकार्‍यांनी विविध विषय मंजुरीसाठी अधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. विषय नियमात बसत नसला तरी अधिकार्‍यांवर दबाव आणून मंजुरी घेण्याचा प्रयत्न पदाधिकार्‍यांकडून सुरू होता. त्यामुळे शनिवार, रविवारनंतर उपायुक्त, वरिष्ठ अधिकार्‍यांनी सलग सुटी टाकून काढता पाय घेतला. शेवटच्या टप्प्यात 'त्या पापात आपण भागीदार नको,' अशी त्यांची भावना होती असे सूत्रांकडून समजले.

महापालिका प्रशासन तोंडघशी
मनपा पदाधिकार्‍यांची पंचवार्षिक मुदत नेमकी कधी संपते याची निश्चित तारीखच कोणाला माहीत नसल्याने आज मनपा प्रशासन तोंडघशी पडले. कारण, 31 डिसेंबरला पदाधिकार्‍यांची मुदत संपत असल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रशासनाने 28 व 29 तारखेला स्थायी समिती व सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला होता. त्यात अनेक जागांच्या विषयांसह अनेक महत्त्वाचे विषय होते. परंतु, राज्य निवडणूक आयोगाचे 27 डिसेंबर 2023 शेवटची तारीख असल्याने पत्र धाडल्याने त्या सभा रद्द ठरल्या. त्यामुळे पदाधिकार्‍यांनी मुदत नेमकी कधी संपणार होती हेच मनपा प्रशासनाला माहीत नव्हते ते यानिमित्ताने समोर आले. आयुक्त, उपायुक्त, नगरसचिव अशा वरिष्ठ अधिकार्‍यांनाही पंचवार्षिकची निश्चित तारीख माहीत नसल्याने प्रशासनाचा सावळागोंधळ पुढे आला.

महापौर आणि कार्यकाळ
राजगोपाल देवरा (प्रशासक) ः 30-06-2003 ते 08-09-2003
भगवान फुलसौंदर ः 1/1/2004 ते 30/6/2006
संदीप कोतकर ः 1/7/2006 ते 31/12/2008
संग्राम जगताप ः 1/1/2009 ते 30/6/2011
शीलाताई शिंदे ः 1/7/2011 ते 30/12/2013
संग्राम जगताप ः 31/12/2013 ते 27/05/2015
अभिषेक कळमकर ः 8/6/2015 ते 30/6/2016
सुरेखाताई कदम ः 1/07/2016 ते 29/12/2018
बाबासाहेब वाकळे ः 30/12/2018 ते 30/6/2021
रोहिणी शेंडगे ः 1/7/2021 ते 27/12/2023

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news