शिर्डीत ‘ग्राऊंड क्लिअर’, तरी ‘स्पीड ब्रेकर’ची शक्यता! | पुढारी

शिर्डीत ‘ग्राऊंड क्लिअर’, तरी ‘स्पीड ब्रेकर’ची शक्यता!

संदीप रोडे

नगर जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघापैंकी शिर्डी गत तीन टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर आता भाजपचा झेंडा भक्कमपणे फडकतो आहे. स्व. तुकाराम गडाख यांचा अपवाद सोडला 1998 पासून नगर दक्षिणने भाजपची साथसंगत केल्याचे दिसते. सात वेळेस खासदार असलेले स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्यानंतर सलग तीन वेळा सेनेचा खासदार राहिलेल्या शिर्डीवर उबाठा सेनेची सगळी नजर आहे. ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पराभवासाठी ठाकरे रणनीती आखत आहेत. माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे सेनेचे दावेदार मानले जात असतानाच आता माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या रूपाने तिसर्‍या दावेदारानेही शड्डू ठोकला आहे.

शिर्डीवरचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीतीचा भाग म्हणून पदाधिकार्‍यांची खांदेपालट केली; मात्र उमेदवारीचा ‘पिक्चर क्लीअर’ व्हायला अजूनही तयार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या होमपीचवर भाजपला ‘ग्राऊंड क्लीअर’ असले तरी शिंदे सेनेकडे असलेली जागा ‘स्पीड ब्रेकर’ ठरू पाहतेय. आता त्यावर काय अन् कसा तोडगा निघणार यावरच शिर्डीचे कोडे सुटणार असले तरी जो-तो ‘अंदाज अपना अपना’ मांडताना दिसत आहेत.

2009 च्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्यासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या रूपाने शिर्डीत सेनेचा पहिला खासदार झाला. 2014 च्या निवडणुकीत वाकचौरे यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसचा हात धरला. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी सदाशिव लोखंडे यांना शिर्डीत आणले अन् अवघ्या पंधरा दिवसांत लोखंडे यांची लॉटरी लागली. काँग्रेसचे वाकचौरे यांचा पराभव करत लोखंडे यांनी शिर्डीत सेनेचा गड राखला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करत लोखंडे दुसर्‍या टर्मला खासदार झाले. शिवसेना दुभंगली तेव्हा लोखंडे यांनी शिंदे सेनेचा रस्ता निवडला. सलग तीन टर्म शिवसेनेचा खासदार अन् लोखंडेंचा बदलेला ट्रॅक पाहता शिर्डी उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून सुटणार तरी कशी.

शिर्डी जिंकण्याचा निर्धार म्हणूनच निष्ठावंतांच्या हाती धुरा देत सहा तालुक्यांत पदाधिकार्‍यांची खांदेपालट केली. ठाकरे यांच्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली, तेव्हा माजी मंत्री बबनराव घोलप हे एकमेव नाव समोर आले. पुढे भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी झाली अन् ते घोलपांच्या बरोबरीने दावेदारी करू लागले. दोघांत कोण? याचा फैसला होण्यापूर्वीच माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनीही ‘शिर्डी लढविण्याचा इरादा’ जाहीर केला. आता ठाकरे सेनेचा उमेदवार कोण? याकडे नगरच नव्हे तर राज्याच्या नजरा लागून आहेत.

थोरातांची बांधणी अन् विखेंचे इरादे!
नेवाशात माजी मंत्री आ. शंकरराव गडाख हे एकमेव शिलेदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. मात्र काँग्रेसची विशेषत: माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांची साथ लाभल्याने उबाठा सेनेचे ‘हौसले’ बुलंद’ झाले आहेत. कोपरगावात भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेंसारखा लढवय्या सरदार आपलासा करत थोरातांनी मंत्री विखे पाटील यांना धक्का दिलाच आहे. आता पुढे काय, आ. थोरातांनाच ठाऊक. भीमराव बडदेंचा अपवाद सोडला तर शिर्डी भाजपला जिंकता आलेली नाही. आता मात्र मोदी करिश्मा अन् विखेंसारखे चातुर्य, तसेच माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्यासारखे बलाढ्य नेते सोबत असताना जिंकण्याचा इरादा असला तरी जागावाटपाचा तिढा अन् केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची पुन्हा शिर्डी लढविण्याची इच्छा पाहता, भाजपला ‘ग्राऊंड क्लीअरन्स’ मिळेल की नाही, ही सांशकता दिसत आहे. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते, हे गृहीत धरता शिर्डीत कमळ फुलले तर आश्चर्य वाटू नये, इतकेच!

Back to top button