नगरी मातीत पिकणार काश्मिरी सफरचंद ! | पुढारी

नगरी मातीत पिकणार काश्मिरी सफरचंद !

शशिकांत पवार

नगर तालुका : तालुका दुष्काळी पट्टा, तसेच पर्जन्य छायेचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील शेती संपूर्णतः निसर्गाच्या भरवशावर. तालुक्यात शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना नेहमीच निसर्गावर अवलंबून राहावे लागते. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने अपवादात्मक स्थिती वगळता शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याचे चित्र आहे. त्यावर मात करण्यासाठी जेऊर येथील शेतकर्‍याने आधुनिकतेची कास धरत सफरचंदाची यशस्वी लागवड केली असून, झाडांनी फळधारणा देखील केली आहे. त्यामुळे आता नगरी मातीत काश्मिरी सफरचंदाची गोडी चाखायला मिळणार आहे.

जेऊर येथील युवा शेतकरी अमोल काळे यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग आपल्या शेतात राबविला आहे. त्यासाठी उष्ण हवामानात येणार्‍या सफरचंदांच्या रोपांची निवड करण्यात आली. हर्मन 99, डॉर्सेट गोल्डन, आण्णा या तीन जातींच्या रोपांची बारा बाय पंधरा अंतरावर लागवड करण्यात आली आहे. सफरचंदाची रोपे हिमाचल प्रदेश मधील विलासपूर येथून आणण्यात आली आहेत. अल्पभूधारक असलेले अमोल काळे यांनी सफरचंदाच्या उत्पन्नाविषयी संपूर्ण माहिती घेऊन लागवड केली आहे.

दीड वर्षांपूर्वी लागवड केलेल्या रोपांनी फळधारणा देखील केली आहे. रोपांना मावा वगळता इतर कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव जाणवत नाही. मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन सफरचंद लागवडीसाठी पोषक असते. लावलेल्या रोपांना साधारणपणे तीन वर्षांनी पूर्णपणे फळधारणा होते. तीन वर्षे झालेल्या झाडाला सुमारे 20 किलोपर्यंत फळांची धारणा होत असल्याची माहिती काळे यांनी दिली. रोपांच्या वाढीसाठी गांडूळ खताचा वापर करण्यात येत आहे. सफरचंद लागवडीसाठी पाणी देखील जास्त लागत नसल्याने दुष्काळी पट्ट्यात सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरणार आहे.

अमोल काळे यांनी शंभर झाडांची लागवड केलेली आहे. झाडांनी दीड वर्षातच फळधारणा केल्याचे पाहावयास मिळत आहे. नगरी मातीतील सफरचंद चवीसाठी देखील गोड आहेत. सफरचंद लागवड केलेल्या क्षेत्रात आंतरपीक देखील घेतले जात आहेत. दुष्काळी, कोरडवाहू पट्ट्यात सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी झाल्याने शेतकर्‍यांच्या देखील आशा पल्लवीत झाल्या आहेत. काळे यांच्या सफरचंद लागवडीच्या प्रयोगाचे अनुकरण तालुक्यात इतर भागातही करण्यात येणार असल्याने नगरी मातीतच काश्मीरच्या सफरचंदाची गोडी चाखायला मिळणार आहे.

नगर तालुक्यातील शेतीसाठी शाश्वत पाणी योजना उपलब्ध नाही. शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर येणार्‍या सफरचंदाची लागवड तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
                                       – संदीप काळे, कृषीतज्ज्ञ, साईनाथ कृषी उद्योग

शेती करताना खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसविणे गरजेचे आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेती तोट्यात जात आहे. शेतकर्‍यांनी आधुनिकतेची कास धरावी. सफरचंद लागवड शेतकर्‍यांसमोर चांगला पर्याय आहे.
                                                   -अमोल काळे, शेतकरी, जेऊर

 

Back to top button