नगर : माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ठाकरे सेनेचे दावेदार मानले जात असतानाच आता माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या रूपाने तिसर्या दावेदारानेही शड्डू ठोकला आहे. शिर्डीवरचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीतीचा भाग म्हणून पदाधिकार्यांची खांदेपालट केली; मात्र उमेदवारीचे 'पिक्चर क्लीअर' व्हायला अजूनही तयार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या होमपिचवर भाजपला 'ग्राऊंड क्लीअर' असले तरी शिंदे सेनेकडे असलेली जागा 'स्पीडब्रेकर' ठरू पाहतेय. आता त्यावर काय अन् कसा तोडगा निघणार, यावरच शिर्डीचे कोडे सुटणार असले तरी जो तो 'अंदाज अपना अपना' मांडताना दिसत आहेत.
2009 च्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्यासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत भाऊसाहेब वाकचौरे यांच्या रूपाने शिर्डीत सेनेचा पहिला खासदार झाला. 2014 च्या निवडणुकीत वाकचौरे यांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' करत काँग्रेसचा हात धरला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी सदाशिव लोखंडे यांना शिर्डीत आणले अन् अवघ्या पंधरा दिवसांत लोखंडे यांची लॉटरी लागली. काँग्रेसचे वाकचौरे यांचा पराभव करत लोखंडे यांनी शिर्डीत सेनेचा गड राखला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव करत लोखंडे दुसर्या टर्मला खासदार झाले. शिवसेना दुभंगली तेव्हा लोखंडे यांनी शिंदे सेनेचा रस्ता निवडला.
सलग तीन टर्म शिवसेनेचा खासदार अन् लोखंडेंचा बदलेला ट्रॅक पाहता शिर्डी उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून सुटणार तरी कशी? शिर्डी जिंकण्याचा निर्धार म्हणूनच निष्ठावंतांच्या हाती धुरा देत सहा तालुक्यांत पदाधिकार्यांची खांदेपालट केली. ठाकरे यांच्यावर उमेदवार शोधण्याची वेळ आली, तेव्हा माजी मंत्री बबनराव घोलप हे एकमेव नाव समोर आले. पुढे भाऊसाहेब वाकचौरे यांची घरवापसी झाली अन् ते घोलपांच्या बरोबरीने दावेदारी करू लागले. दोघांत कोण, याचा फैसला होण्यापूर्वीच माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनीही 'शिर्डी लढविण्याचा इरादा' जाहीर केला. आता ठाकरे सेनेचा उमेदवार कोण, याकडे नगरच नव्हे, तर राज्याच्या नजरा लागून आहेत.
द़ृष्टिक्षेपात शिर्डी लोकसभा
विधानसभा मतदारसंघ : संगमनेर, अकोले, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा
कोणाचे किती आमदार : काँग्रेस 2, उबाठा सेना 1, भाजप 1, राष्ट्रवादी (अजित पवार) 2