सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण : खासदार सुजय विखे | पुढारी

सोलापूर महामार्गाचे नवीन वर्षात लोकार्पण : खासदार सुजय विखे

रूईछत्तीशी : पुढारी वृत्तसेवा :  नगर-सोलापूर महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून अतिशय वेगाने सुरू आहे. नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा हा महामार्ग असल्याने, नगर शहरातील व्यापारही गतिमान होणार आहे पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर अशी देवस्थाने या महामार्गामुळे प्रकाशझोतात आलेली आहेत. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून या महामार्गाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत वारंवार हा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून, महामार्गाचे काम मार्गी लागत आहे. मागील दहा ते बारा वर्षांपासून नगरकडे येणारी वाहतूक स्थानिकमार्गे जात होती. आता ही सर्व वाहतूक महामार्गाने शहराकडे येणार असल्याने मार्गावरील सर्व गावे प्रकाशझोतात येणार आहेत.

या महामार्गामुळे शैक्षणिक गुणवत्ता देखील सुधारणार आहे. उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते. विशेषत मुलींना शिक्षण घेण्यासाठी आता हा मार्ग सुलभ झाला आहे. मध्यंतरी रस्ता खराब असल्याने पालक वर्ग मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत होते. आता रस्ता सुसाट झाल्याने मुलींच्या शिक्षणाचे दरवाजे जास्त खुले झाले आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरेशा मिळत नव्हत्या. आता शहराकडे आरोग्य सुविधा घेण्यासाठी वेळेवर पोहोचता येणार असल्याने लोकांच्या जीवनात नगर-सोलापूर महामार्ग गतिशील आणि कृतिशील ठरणार आहे.

नवीन वर्षात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध केला असून, येत्या दोन महिन्यांत अनेक विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे.
                                                 – खा.सुजय विखे, नगर दक्षिण लोकसभा.

Back to top button