

नगर : पुढारी वृत्तसेवा : विकास मंडळाच्या सत्ता परिवर्तनानंतर लालटाकीजवळच्या जागेवर गुरुजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बांधकामासाठी निधी कसा उपलब्ध करायचा, यावरून सर्वसाधारण सभा वादळी ठरली होती. यात डॉ. संजय कळमकर यांच्या नेतृत्वात समिती नेमून दोन महिन्यांत अहवाल द्यावा, असे ठरल्याचे सांगितले गेले. मात्र आता तीन महिने उलटूनही या समितीने कोणताही अहवाल दिला नसल्याने कालच्या विकास मंडळाच्या सभेत अध्यक्ष प्रदीप दळवी यांनी संबंधित समितीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गुरुजींचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती देताना दळवी यांनी सांगितले की, विकास मंडळाच्या जागेचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे, त्या बांधकामाचा निर्णय घेतला नाही तर, ती जागा करारानुसार केलेल्या अटीशर्तीने बिल्डरच्या घशात जाईल, याला वार्षिक सभेत उपस्थित सर्वांनीच दुजोरा दिला होता. यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन बांधकाम पूर्ण करण्याचे व यासाठी सर्वांचेच समान योगदान असावे असेही ठरले होते. सर्वांनीच सभासदांचे शंका दूर करून हॉस्पीटल संकुल उभारण्याचा ठराव संमत केला. यानुसार याच सर्वसाधारण सभेत विकास मंडळ बांधकाम समिती गठित करण्यात आली.
या समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांची निवड करण्यात आली. या समितीचे सदस्य म्हणून सर्व संघटनांचे प्रतिनिधीचीही सर्वानुमते निवड करण्यात आली. पुढील दोन महिन्यात ही समिती सभासद जनजागृती करून हॉस्पीटल संकुल उभारण्याचा निर्णय घेईल, असा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. विकास मंडळाच्या जागेत भव्यदिव्य मल्टीस्पेशालिटी गुरुजी हॉस्पीटल संकुल दिमाखात नक्कीच उभं राहिल असं जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना वाटतयं पण कुठे काय काय घडलं बिघडलं हे मात्र कळायला मार्ग नाही.
मनात एक आणि ओठात एक
या समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य प्रतिनिधी हे विकास मंडळ बांधकाम पूर्ण करण्यासाठी जाहिर सभेत सर्वांना सांगत होते. मोठ्या अपेक्षेने सभासदांनी यांना काम करण्याची संधी पण दिली. पण मनात एक अन् ओठात एक होते, त्यामुळेच कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा आरोपही पुढे येत आहे.
समितीचीची इच्छा नाही
विकास मंडळाच्या जागी सध्या उभी असलेली अपूर्ण इमारत अशी ठेवणे हे परवडणारे नाही, त्यातच या समितीची काम करण्याची इच्छा दिसत नसल्याने ही समिती बरखास्त करण्याचा निर्णय विकास मंडळाच्या मासिक सभेत घेण्यात आला असल्याचे दळवी यांनी सांगितले.
आमसभेत पुढील निर्णय घेणार
अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली सदिच्छा मंडळ शिक्षक भारती ऐक्य मंडळ परिवर्तन मंडळ यांच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विकास मंडळाचे उपाध्यक्ष नवनाथ दिवटे, सचिव संतोष आंबेकर तसेच भास्कर कराळे यांनी दिली.
दरम्यान गुरुमाऊली सदिच्छा मंडळ व मित्र पक्षांच्या आदेशानुसार आमसभेत निर्णय घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे आघाडीचे नेते राजकुमार साळवे, राजेंद्र शिंदे, अर्जुन शिरसाठ, रवींद्र पिंपळे, सलीमखान पठाण, बाळासाहेब कदम, शरद वांढेकर दिनेश खोसे, मुकेश गडदे, प्रवीण शेरकर यांनी सांगितले.
समितीला दोन स्मरणपत्रे; उत्तर काहीच नाही
सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र. 14 नुसार सर्व संघटना प्रतिनिधी यांची विकास मंडळ बांधकाम समिती स्थापन झाली खरी, त्यांना विकास मंडळाच्या पदाधिकारीकडून 1 सप्टेंबर 2023 रोजी पहिले पत्र ही पाठवण्यात आले. या अपूर्ण बांधकाम बाबत निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली पण उत्तर काहीच नाही. 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुसरे स्मरणपत्र पाठवण्यात आले तरी पण उत्तर काहीच नाही. या समितीने 2 महिन्यात निर्णय घ्यावा असे जाहीर सर्वसाधारण सभेत ठरले होते. ही मुदत 20 ऑक्टोबर 2023 रोजी समाप्त होत होती, अशा आशयाचा पुन्हा एकदा स्मरण म्हणुन व्हॉटसअप संदेश पाठवण्यात आला, पण उत्तर काहीच नाही आले.