

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नगररचना विभागात सामान्य माणूस घर बांधण्यासाठी परवानगी घेण्यासाठी आल्यास त्याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी करण्यात येते. नगरसेवकांकडे गेल्यास जास्त पैसे लागतील असेही सांगण्यात येते, असा आरोप विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी बुधवारी (दि. 20) महासभेत केला. त्यावर महापालिका नगररचनाकार राम चारठाणकर निरुत्तर झाले. महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसचिव एस. बी. तडवी उपस्थित होते.
नगररचनाचे कर्मचारी बिल्डरांच्या घरी
नगररचना विभागातील कर्मचार्यांना सामान्य माणसाचे काम करण्यास वेळ नाही. ते बिल्डरांच्या वाहनात फिरतात आणि त्यांच्याच घरी राहतात, असे आरोप कुमार वाकळे यांनी केला. त्यावर नगररचनाकार चारठाणकर म्हणाले, अशा कर्मचार्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
समारोप सभा होणार
सभा सुरू असतानाच नगरसेवक मनोज कोतकर, श्याम नळकांडे यांनी अधिकारी व पदाधिकारी यांचे आभार मानले. त्या वेळी सर्वच सदस्यांनी, पुढील दहा दिवसांत आणखी एक समारोप सभा घ्यावी. त्यात सर्वांना बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी संपत बारस्कर यांनी केली. त्यावर महापौरांनी लवकरच अजेंडा ठरवून सभा घेण्यात येईल, असे सांगितले.
..जरांगे पाटील यांना आमंत्रित करा : शीला चव्हाण
मराठा आरक्षणासाठी येत्या काही महिन्यांपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. मराठा समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या आवारात उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होत आहेत. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना आंमत्रित करावे, अशी मागणी नगरसेविका शिला चव्हाण यांनी केली. त्यास मागणीस सर्व सदस्यांनी बाके वाजवून समर्थन दिले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज यांना निमंत्रण द्यावे. त्यावर सभापती गणेश कवडे म्हणाले, महाराजाचे वंशज कार्यक्रमात व्यस्त असल्याने येऊ शकणार नाहीत. परंतु, मनोज जरांगे पाटील यांच्याशी निश्चित संपर्क करण्यात येईल.
अधिकारी गैरहजर, प्रारंभीच गदारोळ
महासभा एक वाजता सुरू झाली. परंतु, सभेला आयुक्त, उपायुक्त व विभागप्रमुख गैरहजर होते. त्यामुळे आमच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार, त्यावर रोलिंग कोण देणार, असे सवाल विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, डॉ. सागर बोरूडे यांनी उपस्थित केला. उशिरा येणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, नगरसेवक श्याम नळकांडे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी, सभा सुरू करावी, महापौर रोलिंग देतील असे सांगितले. परंतु, त्यावर समाधान न झाल्याने गदारोळ सुरूच होता. अखेर आयुक्त आल्यानंतर सभा सुरू झाली.फ
नगररचना विभागात जागोजागी टोलनाके
नगर शहरात सामान्य माणूस स्वतःच्या जागेवर घर बांधण्यास काढतो. तर, नगररचनाचे कर्मचारी प्लॅन मंजुरीसाठी दोन लाखांची मागणी करतात. बिल्डरकडून घर घेतल्यानंतर पैसे नाही आणि स्वतः नागरिकांनी मंजुरी मागितल्यास पैसे मोजावे लागतात. सामान्य माणसाने घर बांधायचे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नोंदणी करणार्यापासून वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत पैसे मोजावे लागतात. नगररचना विभागातील हे टोलनाके बंद करा, अशी मागणी संपत बारस्कर, कुमार वाकळे, डॉ. सागर बोरुडे, श्याम नळाकाडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केला.
इंदिरा कॉलनीचे नाव बदलून केले होेते लालूशेठ मध्यान
महानगरपालिकेच्या महासभेत इतिवृत्त मंजूर करण्यामध्ये इंदिरा कॉलनीचे नाव बदलून त्या ऐवजी लालूशेठ मद्यान हे नाव दिले होते. त्यावर मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी सभागृहात हा गंभीर प्रश्न उघडकीस आणून देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कार्य संपूर्ण जगाला माहीत असून देशासाठी वीरमरण आले, त्यांचे नाव काढून लालूशेठ मद्यान हे नाव देणे कितपत योग्य आहे? या नावासाठी कोणत्या नगरसेवकांनी पत्र दिले. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे यांचे नाव पुढे येताच सभागृहातील सर्व नगरसेवक अवाक झाले. हे इतिवृत्त समोर येताच महापौर रोहिणी शेंडगे यांनी ते फेटाळून लावत इंदिरा कॉलनी ऐवजी इंदिरा गांधी कॉलनी असे नामकरण करण्यास मंजुरी दिली.