नगर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा खालावला

नगर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा खालावला
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सरासरीपेक्षा कमी पडलेला पाऊस आणि जायकवाडी धरणात सोडण्यात आलेले जवळपास सव्वापाच टीएमसी पाणी त्यामुळे यंदा जिल्ह्यात फक्त 37 हजार 300 दलघफू पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 13 हजार 178 दलघफू पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत नगर, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी या शहरांसह दोनशे ते अडीचशे पाणीयोजनांना जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा करताना दमछाक होणार आहे. रब्बी पिकांची आवर्तनेदेखील कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे.

सरासरीइतका पाऊस झाल्यास भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा, सीना व इतर लहान मोठी धरणे ओव्हर-फ्लो होतात. या सर्व धरणांत जवळपास 51 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होतो. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. धरणांच्या लाभक्षेत्रापेक्षा पाणलोट क्षेत्रात पाऊस थोडाफार चांगला झाला. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणे ओव्हर-फ्लो झालीत. मुळा धरण मात्र 90 टक्केच भरले.
जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी जिल्ह्यातील सव्वापाच टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आजमितीस जिल्ह्यात फक्त 37 हजार 300 दलघफू पाणीसाठा उरला आहे. 30 जूनपर्यंत या पाणीसाठ्यातून पिण्यासाठी लाभक्षेत्रातील पाणीयोजना तसेच रब्बी पिकांसाठी आवर्तन देताना प्रशासनाची दमछाक होणार आहे.

गेल्या वर्षी 18 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील धरणांत तब्बल 50 हजार 478 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 13 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. दमदार पावसाअभावी दिवाळीपूर्वीच पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. पाथर्डी, संगमनेर तालुक्यांत जनतेला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत. उन्हाची तीव्रता जसजशी वाढत जार्ईल तसतशी पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीपासून पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहे. प्रसंगी टँकर भरण्यासाठी पाणीयोजनांचा आधार घेतली जाण्याची शक्यता आहे.

धरणांतील मृत साठाच 6 टीएमसी
आठ धरणांत एकूण 5 हजार 971 दलघफू इतका मृत साठा आहे. यामध्ये सर्वाधिक मुळा धरणाचा 4 हजार 500 दलघफू, भंडारदरा 300 दलघफू, निळवंडे 256, आढळा 85, मांडओहोळ 89, घाटशीळ पारगाव 140, सीना 553 व खैरी 48 दलघफूचा समावेश आहे. त्यामुळे सध्या धरणांत 31 हजार 330 दलघफू इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदाचा शिल्लक पाणीसाठा
(कंसात गेल्या वर्षीचा साठा) (दलघफू)
भंडारदरा 6823 (10922), निळवंडे 6610 (8023), मुळा 20670 (25886), आढळा 1005 (1060), मांडओहळ 90.20 (399), पारगाव घाटशीळ 7 (389), सीना 1295 (2400), खैरी 114.73 (519.37), विसापूर 501 (903), मुसळवाडी 46.36 (173.32), टाकळीभान 138 (193.19).

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news