नगर महापालिकेत 1 जानेवारीपासून येणार प्रशासकराज

nagar mnc
nagar mnc
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर महापालिकेच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपुष्टात येत असून, 1 जानेवारी 2024 रोजी महापालिकेत 'प्रशासकराज' येणार आहे. मात्र महापालिका निवडणूक लोकसभा निवडणुकीनंतरच होण्याची शक्यता आहे. प्रशासकराज सुरू झाल्यानंतर कामे करण्याला मर्यादा येणार असल्याचे लक्षात आल्याने 67 लोकनियुक्त व 4 स्वीकृत सदस्यांनी उर्वरित 14 दिवसांच्या काळात मंजूर कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. महापालिकेच्या पंचवार्षिक कार्यकाळाची मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी संपत आहे. मनपात निवडणूक म्हटले की सुमारे एक वर्षांपासूनच लगबग सुरू असते. वार्ड रचना, मतदारयादी अशा कामांची धावपळ सुरू असते. परंतु, मुदत संपत आली तरी अशी धामधूम मनपात दिसली नाही. सध्या राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद महापालिकांसह विविध जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

त्याप्रमाणेच आता नगर महापालिकेची निवडणूकही लांबणीवर पडली. जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहे. मतदारयादी, मतदारजागृतीचे काम सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतरच महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार आहे. त्यामुळे 1 जानेवारीपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू होणार हे निश्चित.

दरम्यान, महापालिकेच्या निवडणुका कधी होतील याचा नेम नाही. त्यामुळे पदाधिकार्‍यांना निवडणुकीची रणनीती गुंडाळून ठेवावी लागणार आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी सतत प्रभागातील जनतेच्या संपर्कात राहावे लागणार आहे. पदावर नसले तरी जनतेची कामे घेऊन महापालिकेत खेटा माराव्या लागणार आहेत. तसे केले नाहीत तर जनतेत विश्वासाहर्ता राहणार नाही आणि मनपाच्या अधिकार्‍यांवर वचक राहणार नाही. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक 'सत्तेत नसलो तरी प्रशासनावर वचक ठेवू' असे सांगत आहेत.

नगरसेवकांचा जीव टांगणीला
महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने सत्ताधारी पदाधिकार्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. शेवटच्या पंधरा दिवसांत मंजूर करून आणलेल्या कामांच्या उद्घाटनाचा त्यांनी प्रभागात सपाटाच लावला आहे. त्यात शेवटची महासभा आणि स्थायी समितीची सभा होणार आहे. त्यात अनेक कामांना मंजुरी मिळविण्यासाठी पदाधिकार्‍यांची धडपड आहे. आता जर कामे केली नाहीत, तर प्रशासकाच्या काळात कामे होतील का आणि कामे नाहीच झाली, तर पुन्हा निवडणुकीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न नगरसेवकांसमोर आहे. त्यामुळे प्रभागातील कामे पूर्ण करणे व कामांना मंजुरी मिळविणे हाच पदाधिकार्‍यांचा अजेंडा आहे.

प्रशासक 'पावर' दाखविणार का?
महापालिकेत अधिकारी शहरातील मूलभूत प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेऊन विविध योजना राबविण्याचे काम अधिकारी करतात. तर, त्यावर अंकुश ठेवण्याचे काम पदाधिकारी करीत असतात. अनेकदा अधिकार्‍यांना पदाधिकार्‍यांच्या दबावापोटी कामे करावी लागतात. त्यातून अधिकारी व पदाधिकार्‍यांची तू तू मै मै होत असते. अनेक वेळा काही कारण नसताना जनहिताच्या कामांना विरोध करतात. सत्ताधार्‍यांच्या एखाद्या निर्णयाला विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करतात. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांच्या शह-काटशहाच्या राजकारणात विकासकामे प्रलंबित राहतात. प्रशासकराज सुरू झाल्यानंतर कोणीही ढवळाढवळ करू शकणार नाही. त्यामुळे प्रशासक पावर वापरून कामे करणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

आयुक्तच होणार प्रशासक?
मध्यंतरी मनपाच्या याच पदाधिकार्‍यांना मुदतवाढ मिळणार अशी चर्चा होती. परंतु, राज्यात एकाही महापालिकेत पदाधिकार्‍यांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे ती केवळ चर्चाच राहिली. आता 1 जानेवारीपासून मनपात प्रशासकराज येणार आहे. त्यामुळे कोण प्रशासक येणार अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. परंतु, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे प्रशासक असतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. डॉ. जावळे प्रशासक झाल्यास काही धडाकेबाज निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news