

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : पोलिस अधिकार्याच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करणारा व तुरूंगातून वीस वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजू उर्फ सुदर्शन नारायण पवार (रा. वाळुज, ता. जि. औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुजरातमधील सुरत शहर व परिसरामध्ये दरोड्याचे दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सहाय्यक फौजदाराच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून करून वीस वर्षांपासून जेल तोडून फरार झालेल्या या आरोपीला कर्जतचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व पथकाने दूरगाव येथे सापळा रचून जेरबंद केले आहे.
राजू पवार हा सुरत ग्रामीण परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यावेळी आरोपी व पोलिसांत चकमक झाली. यामध्ये पोलिसांचा दारूगोळा संपल्यावर आरोपीने सहाय्यक फौजदाराच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला व तो तिथून पळून गेला होता. पोलिसांनी पकडल्यावर वाळुज येथील तुरूंगात असताना तो फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध सुरत येथील अथर्व लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी वीस वर्षांपासून गुजरात पोलिसांना गुंगारा देत होता.
आरोपी राजू पवार हा कर्जत तालुक्यातील दुरगाव परिसरात असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सापळा रचून त्याला पकडले. ही कारवाई उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, हेडकॉन्स्टेबल संभाजी वाबळे, रवींद्र वाघ, दीपक कोल्हे, महादेव कोहक, लक्ष्मण ढवळे, अमित बर्डे, गोरख जाधव, राणी पुरी, अंकुश ढवळे व पोलीस मित्र महेश जामदार यांच्या पथकाने केली.