

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील नियोजित एमआयडीसीसाठी शासनाने तत्काळ नवीन जागेचे प्रस्ताव मागितले आहेत. त्यासाठी लोकांनी लवकारात लवकर जागा सूचवावी. या जागेचे सर्वेक्षण आठ दिवसांत पूर्ण करून शासनाला प्रस्ताव पाठविला जाईल, असे आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या कर्जत एमआयडीसी संदर्भात रविवारी (दि.17) तहसील कार्यालयात आमदार शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गवळी, प्रांताधिकारी पाटील, तहसीलदार गणेश जगदाळे, कर्जत नगरपंचायतचे प्रभारी अधिकारी अजय साळवे, भाजपा तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, काकासाहेब तापकीर, अशोक खेडकर, काका धांडे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉ. शबनम इनामदार, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके, सरपंच पप्पू धुमाळ, युवक अध्यक्ष सोमनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, सुनील यादव, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे, पप्पू धोदाड, अनिल गदादे, अॅड. रानमाळ राणे, राहुल निंबोरे, बंटी यादव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी नियोजित जागेसाठी असणार्या निकषांबाबत माहिती दिली. ही जागा शक्यतो सपाट आणि समतल असावी. दळणवळणासाठी राष्ट्रीय मार्ग, राज्य मार्ग यांच्या लगत असावी. पडीक जमीन असावी. पाण्याची, विजेची सोय असावी. शक्यतो सलग क्षेत्र असावे. अशा प्रकारची शासकीय किंवा खासगी जमीन असावी. संबंधित जमीन धारकास शासन रेडीरेकनर दराच्या 4 पट मोबदला देते. संबंधित शेतजमीन मालकाला त्याच्या जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड निःशुल्क दराने व्यवसायासाठी दिला जातो, असे त्यांनी सांगितले.
आमदार शिंदे म्हणाले, यापूर्वी पाटेगाव खंडाळा येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या जागेला शेतकर्यांनी विरोध केला होता. ईडीच्या कारवाईमुळे देशातून परांगदा झालेला निरव मोदी याची असलेली वादग्रस्त जमीन, इको सेन्सिटीव्ह झोन संदर्भातील काही प्रश्न, वनविभागाची ना-हरकत, प्रस्तावित जमिनीची सलगता नसणे व अन्य काही त्रूटींमुळे तेथील प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नाकारला आहे. त्यामुळे शासनाने एमआयडीसीसाठी तत्काळ नवीन जागेचे प्रस्ताव मागितलेले आहेत. यासाठी लोकांनी जागा सुचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
औद्योगिक वसाहतीमुळे तरूण, तरूणींना रोजगार उपलब्ध होईल . प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. औद्योगिक वसाहत कर्जत तालुक्यात आणि फायदा जमिनी घेणार्या दलालांचा असा सावळा गोंधळ नको, असे आवाहनही त्यांनी केले. लोकांनी सुचविलेल्या जागेचे सर्वेक्षण लवकरात लवकर म्हणजे आठ दिवसात पूर्ण करून घ्यावे. जेणेकरुन पुढील प्रक्रियेस विलंब लागणार नाही. एकदा नियोजित औद्योगिक वसाहतीची जागा सर्व निकष पूर्ण करत निवडली की, त्या ठिकाणी दलालांना जमिनी घेण्यास मज्जाव करू. जमीन धारकांनाही योग्य न्याय मिळेल. जमिनी दलालांना विकू नका, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांनी सहा ठिकाणे सुचविलेली आहेत. त्यामध्ये कोंभळी, चिंचोली रमजान परिसर, थेरगाव राष्ट्रीय महामार्गा लगत, वालवड सुपे परिसर, अळसुंदा, कोर्टी परिसर, शेती महामंडळाशेजारी, पठारवाडी, देऊळवाडी, दगडी बारडगाव हा परिसराचा समावेश आहे. आणखी जागा असल्यास कळविण्याचे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
कुंबेफळ आळसुंदेची जागा सुचविली
यावेळी कुंबेफळ आळसुंदे या परिसरात एमआयडीसी व्हावी. या ठिकाणी जमिनीची उपलब्धता आहे. परिसर पडीक गायरान आहे. पाण्याची व्यवस्था आहे व राष्ट्रीय महामार्गालगत आहे, अशी माहिती सरपंच संतोष धुमाळ यांनी आमदार राम शिंदे आणि अधिकार्यांना दिली.