

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात दोन ठिकाणी दूध भेसळखोरीचा प्रकार शुक्रवारी (दि. 15)अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये उघडकीस आला. मात्र त्या वेळी दूधसंकलन केंद्रावर छापा टाकणार्या अधिकार्यावर हल्ला करण्यात आला. त्याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव येथे दूध भेसळ होत असल्याची तक्रार गुप्त खबर्यामार्फत अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय वारघुडे व नगरचे सहायक आयुक्त भूषण मोरे यांनी संयुक्त पथक तयार करून, शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिलेगाव येथे छापा टाकला. तेथे विजय विठ्ठल कातोरे यांच्या शेती क्षेत्रात दूध भेसळ सुरू असल्याचे निदर्शनास आले. पथकाने भेसळीचे रसायन, तसेच व्हे पावडर जप्त करण्याचा प्रयत्न केला असता कातोरे बंधूंनी अडथळा आणला व अधिकार्यांवर हल्ला केला. त्यात अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे सुरक्षा अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांच्या हाताला दुखापत झाल्याचे समजते. दरम्यान, विजय कातोरे तेथून पळून गेला. साहिल अजय कातोरे (वय 20) यास ताब्यात घेण्यात आले.
संबंधित बातम्या :
पथकाने नंतर माहेगाव येथेही छापा टाकला. तेथे बाळासाहेब हापसे यांच्या शेती क्षेत्रात दूध भेसळीचे रसायन व व्हे पावडर मोठ्या प्रमाणात आढळली. त्या वेळी हापसे पसार झाला. पथकाने जप्त केलेले भेसळीचे दूध, रसायन, व्हे पावडर राहुरी पोलिस ठाण्यात आणली. गुन्हा दाखल करण्यासाठी पथकाने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. दरम्यान, मोरे यांनी पत्रकारांना सांगितले, की दंडात्मक कारवाईनंतर हापसे व कातोरे यांच्यावर नमुने अहवाल मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल. विजय कातोरे यांनी धक्काबुक्की केल्याने त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अन्न, औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकार्यांच्या पथकातील प्रदीप कुटे, राजेश बडे, डॉ. प्रदीप पवार, योगेश देशमुख, नमुना सहायक प्रसाद कुसळेकर यांनी पत्रकारांना कारवाईची माहिती दिली.
त्या पॅराफिनचे पाणी झाले का?
सकाळीच दूध भेसळीचे साहित्य ताब्यात घेऊन अन्न, औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी अधिकार्यावर हल्ला होऊन व्हे पावडर व पॅराफिन लिक्विड जप्त केल्याची माहिती दिली. परंतु रात्रीच्या वेळी पॅराफिन लिक्वीड नसून भेसळ करताना पाणी वापरत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. त्यामुळे सकाळी जप्त केलेले पॅराफिन लिक्विडचे सायंकाळी पाणी झाले का? अशी चर्चा राहुरीत सुरू आहे.