लग्नांसह अंत्यसंस्कारांमध्येही आगामी निवडणुकांचे ब्रँडिंग!

File Photo
File Photo
Published on
Updated on

अकोले : अनेक दिवस अलिप्त असणारे राजकीय पुढारी, नेते, आजी- माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आगामी निवडणुकीस इच्छुक असल्याचे दिसते. निवडणूका दूर असल्या तरी परिसरातील लग्न सोहळे, साखरपुडा, अंत्यविधीसह अगदी दशक्रियाविधीला ते आवर्जून हजेरी लावत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे निवडणूक अगदी जवळ आली की काय, असे संकेत मिळत आहेत. या कार्यक्रमातून इच्छुक मंडळी स्वतःच्या पक्षाचे ब्रँडिंग करण्यात दंग असल्याचे दिसत आहे. लग्नसराईच्या धामधुमीत राजकीय नेते पुन्हा एकदा ठिक-ठिकाणी हजेरी लावताना दिसतात. आपल्या गटातील, प्रभागासह मतदार संघातील सार्वजनिक कार्यक्रमात कधी न दिसणारी राजकीय मंडळी आता मात्र आवर्जून हजर राहत असल्याचे तालुक्यात बघावयास मिळत आहे.

2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत कधीतरी सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावणारे नेते, पुढारी आता मात्र सर्वत्र फिरताना दिसतात. विशेष म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांच्या लग्न सोहळ्याकडे किंवा साखरपुडा, धार्मिक कार्यक्रमाकडे कायम पाठ फिरविणार्‍या नेत्यांना आता मात्र हेच कार्यक्रम हवे-हवेसे वाटत आहेत. अकोले तालुक्यामध्ये सर्व पक्षाचे नेते, पुढारी सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

एकीकडे मागील दोन-तीन वर्षांत सामान्य माणसाच्या समस्याकडे गांभीर्याने न पाहणारे नेते आता मात्र अचानक अवतरले आहेत. सार्वजनिक समारंभांसह वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत आहेत. एकाच दिवशी तब्बल 7-8 ठिकाणी लग्नसोहळ्यांना उपस्थित राहण्याचा धडाका काहींनी लावला आहे. मोठे लग्न असेल तर स्वतः लग्नाला हजर राहायचे, केवळ नाममात्र हजेरी देऊन कार्यकर्त्याला खुश करायचे, अशा प्रकारचा नियमित कार्यक्रम काही राजकीय नेत्यांचा सुरू आहे. अकोले तालुक्यामध्ये परंपरागत राजकीय नेत्यांसह निवडणुकीच्या तोंडावर ज्या- त्या गटात, सर्कलमध्ये इच्छुक असणारे अनेकजण विवाह सोहळे स्वतः हजर राहून पार पाडत आहेत. कार्यकर्त्यांना आर्थिक अडचण असेल तर ती अडचण सोडविण्याचा प्रयत्न पुढार्‍यांच्या माध्यमातून होत आहे. 5 वर्षे हवेत राहणारे हे पुढारी आता मात्र जमिनीवर येत असल्याचे चित्र दिसत आहे.

अकोल्यात कुटुंब लागले कामाला
लग्न सोहळा, साखरपुडा व सार्वजनिक कार्यक्रम एकाच दिवशी अनेक ठिकाणी असल्याने प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींना कार्यक्रम वाटून प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी कशी लावता येईल, याचा प्रयत्न राजकीय नेते व पुढारी करीत आहेत. स्वतःसह पत्नी, भाऊ, बहिणीला तर कधी मुलांना विवाह सोहळ्यास हजर राहण्याच्या सूचना कटाक्षाने नेते देताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news