संगमनेरमधील ‘ते’ अतिक्रमण अखेर जमिनदोस्त | पुढारी

संगमनेरमधील ‘ते’ अतिक्रमण अखेर जमिनदोस्त

संगमनेर/संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील जोर्वे नाक्याजवळ लखमीपुरा भागात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले मुख्याधिकारी राहुल वाघ यांना दोन जणांनी ‘तुझे देख लूँगा’ म्हणत धमकी दिली. अंगावर धावून जात ‘फिर से यही दुकान लगाऊंगा’ असेही ते म्हणाले. गुरुवारी (दि. 14) झालेल्या या प्रकाराबाबत त्या दोघांवरही रात्री उशिरा संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्याधिकारी वाघ यांनी शुक्रवारी पथकासह जाऊन ‘त्या’ गॅरेजचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. लखमीपुरा येथील मशिदीच्या संरक्षक भिंतीलगत ‘इंडिया गॅरेज’ नावाच्या गॅरेजचे अतिक्रमण होते.

ते काढण्यासाठी परिसरातील 24 जणांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले होते. त्यानुसार नगरपालिलेने अतिक्रमण काढण्याच्या सूचना वारवार दिल्या होत्या. अखेर पालिका प्रशासनाने गुरुवारी अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. त्या वेळी शेख रफिक एजाजुद्दीन शेख ऊर्फ रफिक सुन्नी व सारिज एजाज शेख (दोघे रा. लखमीपुरा) यांनी मोहिमेस अडथळा आणला. रफिक मुख्याधिकार्‍यांवर धावून गेला. हातातील कागदांचा गठ्ठा त्यांच्यावर भिरकावत ‘तुझे देख लूँगा मैं, फिर से यही दुकान लगाऊंगा’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. याबाबत मुख्याधिकारी वाघ यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुख्याधिकारी वाघ यांनी शुक्रवारी पालिकेच्या दोन जेसीबीच्या साह्याने इंडिया गॅरेजचे अतिक्रमण जमीनदोस्त केले.

Back to top button