स्वस्तात सोन्याचे आमिष; सराईत आरोपी गजाआड | पुढारी

स्वस्तात सोन्याचे आमिष; सराईत आरोपी गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून दरोडा टाकणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नान्नज (ता. जामखेड) शिवारातून ताब्यात घेतले. त्याला अटक करून जामखेड पोलिसांच्यात ताब्यात दिले. नकुल उर्फ कारभारी अरुण भोसले (वय 25, रा. टाकमुकवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादी रघुनाथ ऋषिकेश शिंदे (वय 48, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) यांना अनोळखी 4 पुरुष आरोपी व 2 अनोळखी आरोपी यांनी स्वस्तामध्ये सोने देतो असे सांगून राजुरी शिवार (ता. जामखेड) येथे बोलावून घेतले. तिथे आल्यानंतर त्यांना काठ्याने मारहाण करून 10 लाख 11 हजार रुपये दरोडा टाकून चोरून नेले. याबाबत जामखेड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली, वरील गुन्हा नकुल अरुण भोसले (रा. उस्मानाबाद) याने त्याच्या साथीदारांसह केला आहे. संशयित आरोपी नकुल भोसले नान्नज शिवारात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी नान्नज शिवारात सापळा लावला. संशयित व्यक्ती दिसताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले. त्याने इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, विश्वास बेरड, रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, विशाल दळवी, फुरकान शेख, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा :

Back to top button