पत्राशेडची दुकानदारी, नगर मनपाला भारी

पत्राशेडची दुकानदारी, नगर मनपाला भारी
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर शहरात दिवसेंदिवस उपनगरातील वसाहतींमध्ये वाढ होत चालली आहे. त्या मुख्य रस्ता, डीपी रोड, उपनगरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनेकांनी पत्राशेडमध्ये दुकाने थाटली आहेत. काही मनपाच्या तर काही खासगी जागेत आहेत. परंतु, एकानेही मनपाकडे परवानगी घेतलेली नाही. मनपाने पत्राशेडधारकांचा सर्व्हे केला. मात्र, एक वर्ष झाले तरी अद्याप कारवाईला मुहूर्त मिळालेला नाही. परिणामी मनपाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे.

शहरातील मुख्य रस्ते व डीपी रस्त्यावर पत्राशेडमध्ये दुकाने सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर साधारण एक वर्षापूर्वी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मनपा अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यानंतर अतिक्रमणाच्या प्रत्यक्षात मोजणीला सुरुवात झाली. अतिक्रमण विभागाने शहरातील सर्वच रस्त्यांचा सर्वे केला असता शहरात सुमारे बाराशे पत्राशेड असल्याचे समोर आले. त्यांनी काही पत्राशेडमध्ये अनधिकृत दुकाने सुरू असल्याचे दिसून आले होते. काही पत्राशेड खासगी जागेत तर काही मनपाच्या रस्त्यावर असल्याचे निष्पन्न झाले. महापालिकेच्या जागेतील पत्राशेडधारकांना मनपाने नोटिसा पाठवून अतिक्रमण काढण्याबाबत कळविले होते. मात्र, अद्याप एक पत्राशेड हटविलेले नाही.

फुकटची जागा, फुटकची वीज
महापालिका स्वतःच्या जागेत अथवा मनपाच्या जागेत पत्राशेड उभारण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत उभारण्यात आलेले पत्राशेड विनापरवाना आहेत. त्याची मनपा दप्तरी नोंद नसल्याने त्याचा कोणताच कर भरण्याची गरज पडत नाही. दुसरीकडे अनेक ठिकाणी पत्राशेडधारक मनपाच्या पथदिव्यांच्या लाईनमधून वीज घेतल्याचे समजते. त्यामुळे पत्राशेडधारकांच्या माध्यमातून मनपाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे.

अतिक्रमण भुईसपाट करा
महापालिकेच्या हद्दीतील सुमारे बाराशे पत्राशेड अतिक्रमणे आहेत. त्यांना प्रभाग समिती कार्यालयातर्फे नोटिसा पाठविल्या होत्या. त्यानंतर संबंधित अतिक्रमणधारकांची प्रभाग समिती कार्यालयात सुनावणी झाली. प्रभाग समिती अधिकार्‍यांनी सुमारे 75 टक्के पत्राशेडची अतिक्रमणे हटवा, असे आदेश पारीत केले आहेत. त्याकडे मनपा अधिकारी कानाडोळा करीत असल्याचे समजते.

नगरसेवकांच्या डोळ्याला पट्टी
शहरात सुमारे बारशे पत्राशेडधारक आहेत. त्यात अनेकजण राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे नेमके कोणाचे पत्राशेड काढायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्याच प्रभागात पत्राशेड असूनही नगरसेवक सभागृहात आवाज उठवीत नाही. निवडणुकीत विरोध नको म्हणून नगरसेवकांनी डोळ्याला पट्टी बांधली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news