

नगर : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन योजनेतील कोट्यवधीची कामे मिळविण्यासाठी काही ठेकेदारांकडून बनावट दस्त तयार करून निविदेसोबत वापरून काम मिळविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याच्या झेडपीतून हालचाली सुरू झाला असल्या, तरी यापूर्वीच्या सर्वच वर्कडन तपासल्यास अनेक बनावट दस्तावेज समोर येणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून समजले. जलजीवनमधून सुमारे 1500 कोटींच्या 829 पाणी योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे मिळविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाते. त्यात संंबंधित ठेकेदारांकडे यापूर्वी आपण केलेल्या कामांचा पूर्णत्वाचा दाखला आवश्यक असतो.
श्रीरामपूर तालुक्यातील एका योजनेच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली गेली. हे काम घेण्यासाठी नाशिकच्या एका ठेकेदार कंपनीने श्रीरामपूर तालुक्यातीलच 'त्या' दुसर्या कामाचे वर्कडन अर्थात काम पूर्णत्वाचा दाखला जोडला होता. या पत्रावर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच उपअभियंता श्रीरामपूर यांच्या नावाच्या स्वाक्षर्या असल्याचे दिसते. या पत्रावर 25 जुलै 2023 ही तारीखही स्पष्ट दिसत आहे. मात्र, या प्रकरणात महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशने लक्ष घातल्यानंतर संबंधित पत्र हे बनावट असल्याचे समोर आले. नाशिकच्या ठेकेदार कंपनीने ज्या कामाचे वर्कडन जोडले आहे, ते काम संगमनेरच्या ठेकेदाराने पूर्ण केले असून, त्याच्या नावाचा कार्यारंभ आदेशही जिल्हा परिषदेतून देण्यात आलेला आहे. असे असताना कार्यारंभ आदेश एकाला आणि काम पूर्णत्वाचा दाखला दुसर्याच्या नावे कसा असू शकतो, याकडे कार्यकारी अभियंता श्रीरंग गडदे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे लक्ष वेधले. प्रशासनाकडूनही या प्रकरणातील गांभीर्य ओळखून शहानिशा करण्यात आली. मात्र नाशिकच्या ठेकेदाराला असे कोणतेही पत्र जिल्हा परिषदेतून देण्यात आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे अशाप्रकारे बनावट दाखले वापरून प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचे पुढे आले आहे. आता तरी सीईओ येरेकर हे सर्व वर्कडन तपासणी करणार का, याकडे लक्ष असणार आहे.
ठेकेदारांमधील स्पर्धेतून तक्रारी!
कोट्यवधीची उलाढाल असल्याने एक-एक काम मिळविण्यासाठी ठेकेदारांमध्ये मोठी स्पर्धा असते. यात जर आपले प्रयत्न 'कमी' पडून ते काम दुसर्याला गेलेच, तर अशा तक्रारी येताना दिसतात. आतापर्यंतच्या तक्रारींचा आढावा घेतल्यास ठेकेदारांतील स्पर्र्धेतूनच कधी स्वतः किंवा कधी त्रयस्थ व्यक्तींच्या नावे तक्रारी केल्या जात असल्याचे पुढे आले आहे. आता श्रीरामपूरच्या तक्रारीतही असेच काही गौडबंगाल आहे का? याविषयी समजू शकले नाही.