

नगर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरामध्ये चैन स्नॅचिंग करणारा सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उंदीरगाव(ता. श्रीरामपूर) येथून अटक केली. सचिन लक्ष्मण ताके (वय 33, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, फिर्यादी उषा अशोक लोंगानी (वय 65, रा. शिंदे पाटील बिल्डिंग, मेहेर मळा, ता. संगमनेर, जि. नगर) 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी नातवाला घेऊन घराकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी गळ्यातील 32 हजार रुपयांचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडून बळजबरीने चोरून नेले. याबाबत संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन आरोपींविरूद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला वरील गुन्ह्याचा तपासाकामी सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील सीसीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता संशयित आरोपी सचिन ताके (रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर) याचे नाव निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, संशयित आरोपी सचिन ताके व त्याचा आणखी एक साथीदार मोटारसायलकवर श्रीगोंदा रोडने चांदनी चौक नगर येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी चांदणी चौक येथे सापळा लावला असता दोघे संशयित येताना दिसले.
त्यांना थांबण्याचा इशारा केला असता पाठीमागील व्यक्ती दुचाकीवरून उतरली असता दुचाकीस्वार जोरात निघून गेला. एकाला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने सचिन ताके असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता साथीदार राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी (रा. श्रीरामपूर) याच्या साथीने संगमनेर शहर व राहाता येथे गंठण चोरी केल्याची कबुली दिली. त्याने गुन्ह्यातील सोन्याचे दागिने विजय पोपट उदावंत (रा. रुई, ता. राहाता) यास विकले असल्याचे सांगितले. त्याच्याकडून दागिने विक्रीतून मिळालेले साडेचार हजार रुपये जप्त केले. पुढील तपासाकामी त्याला संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, संतोष लोढे, रविंद्र कर्डिले, संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, अरुण मोरे, यांच्या पथकाने केली.
29 गुन्हे उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सचिन ताके याला घेतल्यानंतर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या 29 गुन्ह्याची उकल झाली. श्रीरामपूर, तोफखाना, संगमनेर शहर, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, लोणी, जवारलाल, छत्रपती संभाजीनगर आदी पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले.