Nagar News : ..तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार; दुरगाव ग्रामस्थांचे उपोषण | पुढारी

Nagar News : ..तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार; दुरगाव ग्रामस्थांचे उपोषण

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दुरगाव ग्रामस्थांनी विकासकामांबाबत कर्जत तहसील कार्यालयबाहेर उपोषण केले. यामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करून त्यांनी परिसर दणाणून सोडला. मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. कर्जत तालुक्यातील दुरगाव, सोनळवडी, राशीन या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, कुकडी कालव्याच्या डीवाय पंच्याहत्तरमधील अपुर्‍या चार्‍या पूर्ण कराव्यात, यासाठी मागील 25 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

हा रस्ता ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. गावामध्ये उसाचे क्षेत्र तसेच, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, हा रस्ता अतिशय खराब झाल्याने तीन ते चार महिने या रस्त्यावरील वाहतूक बंद राहते. या रस्त्याच्या नदीवरील पूल सीडी वर्क नसल्याने विद्यार्थी व शेतकर्‍यांना येण्याजाण्यासाठी मोठा त्रास होतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने विद्यार्थी अपघात होऊन जखमी होत आहेत. हा रस्ता ग्रामस्थांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच, कुकडी लाभक्षेत्रामध्ये डी वाय 75 या चारीचे काम अपूर्ण राहिल्यामुळे अवघे 30 टक्के क्षेत्रच ओलिताखाली येत आहे.

या गावाचा समावेश कुकडीमध्ये असतानाही 70 टक्के गावे काम अपूर्ण असल्यामुळे वंचित राहत आहेत. जर या चारीचे अपूर्ण काम पूर्ण झाले तर, शंभर टक्के क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रश्नांवर ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. याशिवाय मतदारसंघांमध्ये रोहित पवार व राम शिंदे हे दोन आमदार आहेत. तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे असून, त्यांचे पुत्र सुजय विखे हे या परिसराचे खासदार आहेत. या सर्वांना, तसेच उपमुख्यमंत्री यांना देखील निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, कोणीही ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत नाही. यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या उपस्थितीत रात्री साडेसात वाजता पाटबंधारे विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषदेच्या वतीने गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी राजेंद्र गुंड उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने दुरगाव-सोनाळवाडी -राशीन रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांची रक्कम लागणार असून, या रस्त्यासाठी दोन दिवसांत विभागीय कार्यालयास प्रस्ताव देण्यात येईल, अशी लेखी आश्वासन देण्यात आले. जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता यांच्या वतीने 75 कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांबरोबर स्थळ पाहणी करून येणारे अडथळे दूर केले जातील व त्यानुसार कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करून दिले जाईल. लाभक्षेत्र जास्त आहे व लांबी पण जास्त आहे.यामुळे याबाबत नवीन मोठे पाईप टाकून देण्याविषयी मागणीनुसार अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करू व मंजुरी मिळाल्यानंतर लगेच त्याचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

आमदारांबाबत ग्रामस्थांची नाराजी

दुरगाव-सोनाळवाडी -राशीन रस्ता व कालवा हे दोन्ही प्रश्न गामस्थांसाठी महत्त्वाचे आहेत. मतदारसंघाला आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे हे दोन लोकप्रतिनिधी असताना, दोघांनीही या आंदोलनाची दखल घेतली नाही. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

Back to top button