Nagar News : कपासी पिकाला अग्रीम विमा द्या : शेतकर्‍यांची मागणी | पुढारी

Nagar News : कपासी पिकाला अग्रीम विमा द्या : शेतकर्‍यांची मागणी

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यास सोयाबीन, मका पिकांचा अग्रीम विमा मिळणार नाही. कपाशी बाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी, कपाशी पिकास विमा देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. पावसाळ्यात सलग 21 दिवस खंड पडलेल्या मंडळात 25 टक्के अग्रीम विमा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र, या संदर्भात कोणकोणते पीक यात समाविष्ठ केले आहे, याबाबत शेतकर्‍यांत संभ्रम निर्माण झाला आहे. विमा मिळण्यास कोणत्या अडचणी येत आहेत अथवा वरिष्ठ पातळीवर कुठल्या हालचाली होत आहेत, याची ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी विमा बँक खात्यावर जमा होण्याच्या अपेक्षेत आहेत.

विमा कंपनीने सध्या तरी सोयाबीन व विमा पिकांस अग्रीम विमा लागू केला असून, लवकरच तो शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. मात्र, शेवगाव तालुक्याचे क्षेत्र सोयाबीन व मका पीक विम्यामध्ये अधिसूचित नसल्याने येथे या पिकांना 25 टक्के अग्रीम विम्याचे वाटप करण्यात आले नाही. जिल्ह्यात यासाठी 14 तालुक्यांपैकी फक्त 11 तालुक्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यानंतर बाजरी व तूर पिकांच्या विमा संदर्भात कोणता निर्णय होतो, हे लवकरच समजणार आहे.

या तालुक्यात शासनाने दुष्काळ स्थिती जाहीर केली आहे. केंद्र शासनाचे एक पथक दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहे. तेथे अधिकार्‍यांशी चर्चा करून ते दुष्काळाची पाहणी करणार असल्याचे समजते. शेवगाव तालुक्यात जास्तीत जास्त क्षेत्र कपाशीखाली येते. यंदा पावसाचा खंड होत राहिल्याने कपाशी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर, काही कपाशीचे पिके उत्पन्ना आधीच वाया गेली आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकर्‍यांनी कपाशी पिकाचा विमा उतरविला आहे. तुरीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. शासनाने कपाशी पिकाला विमा लागू करावा व शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत आधार द्यावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button