

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भावाला जेलमधून सोडविण्यासाठी कोर्टातील न्यायाधीश यांच्या कार्यालयातील ओळख असलेल्या स्टेनो व बेंच क्लार्क यांना देण्यासाठी आणलेली 5 लाखांची रोख रक्कम व एक मोबाईल, असा एकूण 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल दिल्ली येथील दोघांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने भरदिवसा चोरून नेण्यात आला. ही घटना 6 डिसेंबरला घडली. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुधादेवी चंदनकुमार सरोज (रा. उत्तमनगर, वेस्ट दिल्ली) यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात 7 डिसेंबरला फिर्याद दिली.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपासाची सूत्रे फिरवित बोगस पत्रकार, पोलिस मित्र म्हणविणार्या संजय मुरलीधर पिसाळ (रा. कोळगाव) याच्यासह कोक्या उर्फ पालखोर भास्कर चव्हाण, पूजा उर्फ घारी किरण भोसले (दोघे रा. विटेकरवाडी, कोळगाव) या तिघांना अवघ्या 24 तासांच्या आत जेरबंद करीत न्यायालयात हजर केले. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्ली येथील सुधादेवी सरोज यांचा भाऊ पुण्यातील येरवडा कारागृहात चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. तेथे त्याची किरण (रा.चिखली) याच्याशी ओळख झाली. कोर्टातील न्याधीशांच्या कार्यालयातील स्टेनो व बेन्च क्लार्क याच्याशी आपली ओळख असून, त्यांना पैसे दिल्यास ते या गुन्ह्यातून लवकर बाहेर काढतील, असे त्याने फिर्यादीच्या भावाला सांगितले. त्यानुसार फिर्यादी सरोज यांचे आरोपी पूजा, तसेच तिचा नातेवाईक असलेल्या सुनील याच्याशी बोलणे झाले. भावाला जेलमधून सोडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देत त्यांनी स्टेनो व बेंच क्लार्क यांना देण्यासाठी पैशाची बोलणी केली.
त्यानुसार फिर्यादी या सैनी सोनी कुमार यांच्यासोबत 6 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता पूजा व सुनील याने सांगितलेल्या ठिकाणी चिखली स्टॅण्डवर पैसे घेऊन आले. सुनील याने त्यांना मोटरसायकलवर बसवून चिखली गावातून पुढे जंगल व डोंगर असलेल्या कोरेगाव परिसरात नेले. त्या ठिकाणी पूजा, सुनील व अनोळखी 6 इसम होते. सुनील व पूजा यांनी पैशांबाबत विचारणा केली. त्यावर आम्ही पैस आणले असून, ते साहेबांनाच देणार असल्याचे सांगितले. त्यावर आरोपी सुनीलने सैनी सोनी कुमार यांच्या गळ्याला चाकू लावला. इतरांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्यांच्याकडील 5 लाख रूपये व 15 हजार रुपयांचा मोबाईल, असा 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.