श्रीसाई दर्शनबारीचा व्यावसायिकांना फटका ; अनास्थेमुळे आर्थिक मंदीचे सावट | पुढारी

श्रीसाई दर्शनबारीचा व्यावसायिकांना फटका ; अनास्थेमुळे आर्थिक मंदीचे सावट

प्रवीण ताटू

शिर्डी : शिर्डीत येणार्‍या साईभक्तांची सेवा आणि सुविधा याच धर्तीवर साई संस्थानची निर्मिती करण्यात आली. त्याच धर्तीवर सुसज्ज आणि अद्ययावत अशा साई दर्शनबारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जुन्या पिंपळवाडी रस्त्यावर असलेली दर्शनबारी नगर-मनमाड रस्त्यालगत गेली. मात्र साई संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेने रस्ता मोकळा करण्याची तसदी घेतली नाही. परिणामी नगर-मनमाड रस्त्याची पूर्व बाजू व साई मंदिर परिसर आणि साई कॉम्लेक्सच्या व्यवसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. याबाबत स्थानिक राजकीय नेत्यांच्या संदिग्ध भूमिकेमुळे व्यावसायिक महिनाभरातच जेरीस आल्याने आर्थिक मंदीचे सावट ओढवले आहे.

शिर्डीच्या व्यवसायाचा आत्मा हा निश्चितच साईभक्त आहे. त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून नगर-मनमाड महामार्गाच्या पूर्वेकडील नागरिकांनी व्यवसायाला तिलांजली दिली होती. जवळके-नांदुर्खी- शिर्डी- पिंपळवाडी-पुणतांबा असा राज्यमार्ग शासनाने मंजूर केला होता. याच मार्गाजवळ साईमंदिर येते. हा मार्ग शिर्डीत आल्यावर नगर पंचायतीने विकास आराखडा तयार केला. त्याच वेळी साई संस्थानाने या रस्त्यावर अतिरिक्त दर्शनबारी केली. या भागातील नागरिकांनी साईभक्तांना सुविधा मिळत असल्याने विरोध दर्शविला नव्हता. मध्यंतरीच्या काळात भाजपचे सरकार आल्यानंतर डॉ. सुरेश हावरे यांच्या विश्वस्त मंडळाने नवीन दर्शनबारीची संकल्पना राबवून 110 कोटींची दर्शनबारी जुन्या प्रसादालयाच्या जागेत केली. त्याआधी या भागातील नागरिकांनी गेली 15 ते 20 वर्षे व्यावसायिक झळ सोसली.

दरम्यानच्या काळात या रस्त्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी हा रस्ता मोकळा करावा, असे आदेश दिले होते. मात्र साईभक्तांना त्रास नको म्हणून कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता जुन्या पिंपळवाडी रस्त्यावरील दर्शनबारी नवीन जागेत हलवण्यात आली. मात्र महिना उलटूनही या रस्त्याने अजूनही मोकळा श्वास घेतला नाही. साई संस्थान या रस्त्यावरचा ताबा सोडण्यास तयार नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दुसरीकडे शिर्डी नगर परिषद कोणतीही भूमिका घेत नाही. या रस्त्यालगत साई कॉम्प्लेक्स आहे. तेथील व्यावसायिकांचा व्यवसाय झाला नाही तर वार्षिक कर आकारताना मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

या रस्त्याबाबत राजकीय नेत्यांचीदेखील मोठी अनास्था दिसून आली आहे. सुरवातीला माजी नगरसेवक सुजित गोंदकर यांनी भूमिका घेतली होती; मात्र त्याचा परिणाम फार काळ टिकला नाही. या रस्त्यावर किमान दोन डझनवर नेते वास्तव्यास आहेत. मात्र हेव्यादाव्यांमुळे या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते आहे. मात्र त्यामुळेच हातावरचा व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात ढकलला जाण्याची आणि त्या वेळी करवसुली करण्यासाठी सुलतानी छळणूक होण्याचीच दाट भीती व्यावसायिकांना भेडसावत आहे.

Back to top button