वातावरण तापले ! तनपुरे जनतेच्या दारी; विखे-कर्डिलेंची धार्मिक वारी | पुढारी

वातावरण तापले ! तनपुरे जनतेच्या दारी; विखे-कर्डिलेंची धार्मिक वारी

राहुरी : रियाज देशमुख : राहुरी तालुक्यात थंडीच्या कडाक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मतदारसंघात जनसंवादावर भर देण्यास सुरुवात केल्यानंतर आता विखे-कर्डिले गटाकडून धार्मिक दर्शनवारीने आगामी निवडणुकांसाठी साखरपेरणी सुरू केलेली दिसत आहे. नियमित वेळेनुसार विधानसभा निवडणुकांना अजून किमान दहा महिने आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीसोबत होणार असल्या, तर केवळ चार-पाच महिनेच हातात असल्याने सारेच तयारीला लागले आहेत. त्यामुळेच तनपुरे जनतेच्या दारी आणि विखे-कर्डिलेंची दर्शनवारी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

निवडणुकांबाबत शिवसेनेकडून (उबाठा) रावसाहेब खेवरे यांना जबाबदारी मिळाली आहे. मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) सत्ताधारी असूनही विरोधकांच्या भूमिकेतूनच अस्तित्व दाखविण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस पदाधिकार्‍यांची भूमिका तळ्यात मळ्यात असून, आगामी निवडणुकीत ‘मिळेल त्यात आनंद’ अशीच त्यांची परिस्थिती दिसत आहे.

नगर जिल्ह्यात मध्यवर्ती असलेल्या राहुरी तालुक्यातील राजकारण नेहमीच आलटून पालटून असल्याचेे बोलले जाते. 1995 पासून सलग 25 वर्षे आमदार राहिलेल्या शिवाजी कर्डिले यांचा विजयाचा वारू तनपुरे यांनी 2019 मध्ये राहुरीत रोखला. पहिल्याच धडाक्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये तब्बल सहा खात्यांचे राज्यमंत्रिपद तनपुरे यांना मिळाले. मतदारसंघ तनपुरेमय करण्यात त्यांना यश आले. विरोधकांमध्ये बसलेल्या अनेकांनी तनपुरेंशी जवळीक साधली. महाविकास आघाडी सत्ताकाळात राहुरीत तनपुरेंना विरोधकच नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती.

पुढे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदे-फडणवीस सत्ता येताच विखे-कर्डिले गटातील कार्यकर्त्यांनी पुन्हा शड्डू ठोकत तनपुरेविरोधाच्या तलवारीला धार लावली. त्यातच खासदार डॉ. सुजय विखे व शिवाजी कर्डिले यांनी एकमेकांना पुन्हा टाळी देत जिल्हा बँकेत करिष्मा घडविला. राज्यात सत्तेत नसले तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीची मोठी ताकद वाटत होती; परंतु राज्यातच राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गट शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत सहभागी झाला. त्या वेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवार गटाच्या पारड्यात वजन टाकले असताना तनपुरे मात्र त्यास अपवाद ठरले.

तनपुरे आणि रोहित पवार हे जिल्ह्यातील दोन आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहिले. या घटनेचे सर्वाधिक परिणाम राहुरी मतदारसंघात झाले. सलग पाच वेळा आमदार राहिलेले शिवाजी कर्डिले यांनी 2019 च्या पराभवानंतर आणि विशेषतः जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर राहुरी मतदारसंघाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसते आहे. तनपुरे साखर कारखान्यात विखे यांना भक्कम साथ देणार्‍या कर्डिले यांची भिस्त त्यामुळेच विखे यांच्यावर जास्त आहे. तालुक्यात विखे गटाची ताकदही मोठी आहे. पण पूर्वी तालुक्यात तथा मतदारसंघात असलेला कर्डिले यांचा दांडगा संपर्क मात्र आता म्हणावा तेवढा राहिला नाही; आमदार तनपुरे यांनी जनसंपर्कात बाजी मारल्याचे सध्या तरी दिसत आहे. राहुरी तालुकाच नाही, तर मतदारसंघातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील गावांमध्येही तनपुरे यांनी लोकसंपर्क चांगलाच वाढविल्याचे दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कर्डिले यांना तनपुरे यांच्या विरोधात उतरायचे आहे की नाही, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होऊ पाहत आहे.

चर्चा खास लोणी फॉर्म्युल्याची
तनपुरे साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून विखे कुटुंबाने मात्र आधीच असलेला राहुरी तालुक्यातील दबदबा वाढविला आहे. सध्या तनपुरे कुटुंब निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून लोकांमध्ये जात असताना विखे यांनी तालुक्याच्या गावागावांतील महिलांना देवदर्शन घडविण्यास सुरवात केली आहे. सध्या रोज एका गावातून काही बस भरून देवदर्शनाला रवाना होत आहेत. पारनेरचे विद्यमान आमदार नीलेश लंके यांच्या गेल्या निवडणुकीच्या मोठ्या यशात अशा ‘दर्शनवारी’चा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. तोच फंडा विखे राबवत आहेत. पण ‘राहुरीतच का?’ आणि ‘कुणासाठी?’ असे मोठ्ठे प्रश्नही उभे राहत आहेत. लोणी आणि परिसरातील महिला भाविकांना विखे यांनी मोठमोठ्या दर्शनयात्रांचा लाभ दिल्याचे सर्वश्रुत आहे. पण राहुरी हा काही विखेंचा विधानसभा मतदारसंघ नाही. आणि लोकसभेसाठी ही तयारी म्हणावी, तर नगर लोकसभा मतदारसंघातील फक्त राहुरी तालुकाच त्यांनी ‘दर्शनवारी’साठी का निवडला असावा, या प्रश्नांचे चर्वितचर्वण लोक करत आहेत. कर्डिलेंचा घटलेला (की घटविलेला?) जनसंपर्क आणि विखेंची ‘दर्शनवारी’ राहुरीच्या गणितात खास ‘लोणी फॉर्म्युला’ घेऊन येण्याची दाट शक्यता त्यामुळेच उच्चरवात व्यक्त होऊ लागली आहे. म्हणूनच राहुरीतून कर्डिले पुन्हा रिंगणात उतरणार, की विखे खरोखर ‘लोणी फॉर्म्युला’ आणतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी सत्तेच्या कामापेक्षा विरोधाच्या माध्यमातून आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रपक्ष म्हणून अजूनही भाजपने शिंदे गटाला अपेक्षित धरलेले नाही, तरीही शिंदे गटाने निवडणुकीची जय्यत तयारी करण्याचा इशारा मात्र दिला आहे. दुसरीकडे ठाकरे शिवसेनेची भिस्त नेहमीप्रमाणे रावसाहेब खेवरे यांच्यावरच आहे.

काँग्रेस पदाधिकारी मात्र तनपुरे गटावर सर्वस्वी अवलंबून आहे. ठाकरे गटाकडूनही तनपुरेंच्या राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे सांगत जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगपरिषदेच्या निवडणुकीसाठीही जोरदार तयारी होत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडूनही निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे. राहुरी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून ‘वंचित’ने चंचूप्रवेश केला आहे. तनपुरे-विखे-कर्डिले या मातब्बर राजकारण्यांविरोधात लढा देण्यासाठीही ‘वंचित’ने सरसावली आहे. त्यामुळे ‘वंचित’ कोणाची डोकेदुखी ठरणार, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे देखील आगामी निवडणुकांमध्ये सन्मानजनक जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा बाळगून आहेत.

Back to top button